नवी दिल्ली: भाजप नेते आणि बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी आज भाजपला रामराम ठोकत, काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजपच्या स्थापना दिनी पक्ष सोडून शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसमध्ये दाखल झाले. यावेळी काँग्रेसने शत्रुघ्न सिन्हा यांना बिहारच्या पाटना साहिब लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. या मतदारसंघात भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांच्यासोबत शत्रुघ्न सिन्हांचा सामना होईल.
शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना भाजपमधील आठवणी जागवल्या. भाजप हा लोकशाहीवादी पक्ष होता मात्र आता त्या पक्षाची वाटचाल हुकूमशाहीकडे झाली आहे. आज सर्व कामं पंतप्रधान कार्यालयातून होत आहेत. कोणत्याही मंत्र्याला अधिकार नाहीत, सर्व मंत्री भीतीत आहेत. ज्येष्ठ नेत्यांना अडगळीत टाकलं आहे. मी सत्याच्या बाजूने उभं राहणं ही माझी चूक ठरली, असा घणाघात शत्रुघ्न सिन्हा यांनी केला.
Delhi: Veteran actor and BJP MP Shatrughan Sinha joins Congress in presence of Congress General Secretary KC Venugopal and Randeep Surjewala pic.twitter.com/T1izPmSEEu
— ANI (@ANI) April 6, 2019
शत्रुघ्न सिन्हांकडून नानाजी देशमुखांचा उल्लेख
यावेळी शत्रुघ्न सिन्हा यांनी आपण भाजपमध्ये कसं दाखल झालो, याचा किस्सा सांगितला. नानाजी देशमुख यांच्या नेतृत्वात माझी राजकारणात सुरुवात झाली, असं शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.
“भाजपचा आज 39 वा स्थापना दिवस आहे. त्यांना शुभेच्छा देतो. त्या पक्षाने मला घडवलं. केवळ भाजपचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे महान नायक, समाजिक कार्यकर्ते, भारतरत्न नानाजी देशमुख यांनी मला मार्गदर्शन केलं. मी जे पी नारायण यांना प्रभावित होऊन भाजपमध्ये आलो, त्यावेळी माझी ओळख नानाजी देशमुख यांच्याशी झाली. त्यांनी माझा सांभाळ केला, प्रशिक्षण दिलं. त्यानंतर त्यांनी अटल बिहारी वाजपेयींकडे सोपवले. वाजपेयींसह दिग्गजांनी मला मार्दर्शन केलं”, असं शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.
कोण आहेत नानाजी देशमुख?
मूळचे महाराष्ट्रातील हिंगोलीचे असलेले नानाजी देशमुख यांना नुकतंच मोदी सरकारने मरणोत्तर भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केलं. देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. तर त्यांच्यासह नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला.
नानाजी देशमुख यांचं ग्रामीण भागाच्या विकासामध्ये मोठं योगदान आहे. त्यांनी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातही योगदान दिलं. भारतीय जनसंघाचे ज्येष्ठ नेते असलेले नानाजी देशमुख यांचं निधन 27 फेब्रुवारी 2010 रोजी झालं. हिंगोली जिल्ह्यातील काडोलीमध्ये त्यांचा जन्म झाला होता. यापूर्वी त्यांना पद्मविभूषण या पुरस्कारानेही गौरविण्यात आलं होतं. 1999 ते 2005 या काळात ते राज्यसभेचे राष्ट्रपती नियुक्त खासदार होते.
प्रत्येक हाताला काम आणि प्रत्येक शेताला पाणी हे नानाजी देशमुख यांचं वाक्य होतं. महाराष्ट्रातील बीड जिल्हा आणि उत्तर प्रदेशातील गोंडामध्ये नानाजी देशमुख यांनी मोठं सामाजिक कार्य केलं. त्यांनी भारताच्या पहिल्या ग्रामीण विद्यापीठाचीही स्थापना केली. चित्रकूट ग्रामोद्योग विद्यापीठाचे पहिले कुलगुरु म्हणून त्यांनी काम पाहिलं.
संबंधित बातम्या
प्रणव मुखर्जी, नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका यांना भारतरत्न जाहीर