नवी दिल्ली | 7 मार्च 2024 : इंडिया आघाडीमधील पक्षांसोबत कॉंग्रेसची जागावाटपाची चर्चा सुरु असतानाच एक मोठी माहिती समोर आलीय. भाजप पाठोपाठ कॉंग्रेसही येत दोन दिवसांमध्ये लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे. या यादीत 110 उमेदवारांची नावे आहेत. यामध्ये रायबरेली, अमेठी यांच्यासह वाराणसी मतदार संघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या नावाचा समवेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
काँग्रेसने लोकसभा निवडणूक 2024 च्या तयारीला अंतिम स्वरूप दिले आहे. कॉंग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. याच बैठकीत 110 जागांसाठीचे उमेदवार निश्चित केले जाणार आहेत. पहिल्या यादीमध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, छत्तीसगड, हरियाणा आणि दिल्लीसह दक्षिणेकडील काही महत्त्वाच्या जागांसाठीच्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाऊ शकते असे या सूत्रांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी लोकसभा मतदार संघातून निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात कॉंग्रेस अजय राय यांना निवडणुकीत उतरविणार आहे. अजय राय यांनी 2019 मध्येही मोदी यांना लढत दिली होती. तर, कॉंग्रेस नेते राहुल गांधी हे दोन मतदार संघातून निवडणूक लढविणार आहेत. त्यात अमेठी आणि तेलंगणा मधील एका मतदार संघाचा समावेश आहे. रायबरेलीची जागा प्रियांका गांधी लढविण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसीमधून लढणारे अजय राय हे उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यासोबतच दिल्ली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अरविंदर सिंग लवली यांना ईशान्य दिल्लीतून भारतीय जनता पक्षाचे खासदार मनोज तिवारी यांच्या विरोधात तिकीट दिले जाऊ शकते. त्याचप्रमाणे पहिल्या यादीमध्ये अखिल भारतीय महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा अलका लांबा यांचे तिकीटही निश्चित होऊ शकते अशी माहिती समोर आलीय.
छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल (राजनांदगाव), हरियाणातून माजी मुख्यमंत्री भूपेंद्र हुड्डा यांचे पुत्र दीपेंद्र हुडा यांना (रोहतक), मध्य प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी, दिग्विजय सिंग, कांतीलाल भुरिया, सुरेश पचौरी, माजी मुख्यमंत्री भूपेंद्र हुडा यांनाही तिकीट देण्यात येणार आहे. मात्र, राजस्थानमधील अशोक गेहलोत आणि सचिन पायलट या दोन बड्या नेत्यांच्या नावांबाबत अद्याप काही स्पष्टता नाही.
कॉंग्रेसची 16 सदस्यांची केंद्रीय निवडणूक समिती ही यादी अंतिम करणार आहे. काँग्रेससह भारत आघाडीकडून उमेदवार निवडीबाबत अत्यंत सावधगिरी बाळगली जात आहे. ज्या जागांसाठी तीन ते चार नावे समितीसमोर आली आहेत. त्या सर्व जागांवर मोठ्या सावधगिरीने पाऊल ठेवत आहे. विजयासोबतच जातीय समीकरणाचीही पूर्ण काळजी घेण्यात येत असल्याची माहितीही या सूत्रांनी दिलीय.
काँग्रेस सर्व विद्यमान खासदारांना पुन्हा तिकीट देणार आहे. कोणत्याही खासदाराचे तिकीट रद्द करण्यात येणार नाही. एवढेच नाही तर काँग्रेस एकच उमेदवार असलेल्या जागांवर तिकीट देणार आहे. खरी चुरस दोन ते तीन उमेदवार असलेल्या जागांवर होणार आहे.