महायुतीकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? भाजपची रणनीती काय? दिल्लीत काय ठरलं?

| Updated on: Jun 20, 2024 | 10:09 PM

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपने राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. दिल्लीतील बैठकीनंतर फडणवीस सक्रिय झाले आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदे यांनी कमी जागांवर निवडणूक लढवून जास्त मते घेतल्याचे सांगितले आहे.

महायुतीकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? भाजपची रणनीती काय? दिल्लीत काय ठरलं?
cm eknath shinde and devendra fadnavis
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

लोकसभा निवडणुकीत भाजप कमी जागा मिळाल्या. त्या पराभवाची जबाबदारी घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदावरून पायउतार होण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, पक्ष नेतृत्वाने त्यांना हिरवा कंदील न देता उपमुख्यमंत्रीपदावर काम सुरू ठेवण्यास सांगितले होते. यानंतर दिल्लीत केंद्रीय नेतृत्वासोबत महाराष्ट्र भाजपच्या नेत्याची बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, पंकजा मुंडे, मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासह भूपेंद्र यादव आणि अश्चिनी वैष्णव उपस्थित होते. या बैठकीमध्ये राज्य नेतृत्वाला महाराष्ट्रात नियमित कोअर कमिटी किंवा राज्य संसदीय बैठक का घेतली जात नाही? असा थेट सवाल केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याचप्रमाणे राज्य नेतृत्वाला कोणीही एकट्याने निर्णय घेऊ नये अशी ताकीद देण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले.

दिल्लीत राष्ट्रीय नेतृत्वासोबत महाराष्ट्र भाजप नेत्यांच्या बैठकीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र, लोकसभेच्या अवघ्या 9 जागा जिंकल्यामुळे केंद्रीय नेतृत्व पक्षाच्या कामगिरीवर खूश नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याशिवाय लढवण्याची रणनीती पक्षाच्या हायकमांडने आखली आहे.

महाराष्ट्र भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षनेतृत्व आणि मित्रपक्ष मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेतील असे म्हटले आहे. मात्र, असे असले तरी भाजप मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याशिवाय निवडणूक लढवणार आहे. दरम्यान, कोअर कमिटीच्या बैठकीनंतर मुंबई उत्तर लोकसभेतून विजयी झालेले केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी पक्षाने ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य नेतृत्वात बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती दिली होती.

लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसपेक्षा भाजप मागे पडला. विधानसभेत भाजपचे 100 पेक्षा जास्त आमदार आहेत. पण, लोकसभेत भाजपचे 9 तर काँग्रेसचे 13 खासदार आहेत. अपक्ष विशाल पाटील यांच्यामुळे काँग्रेसची संख्या 14 वर पोहोचली आहे. अशा परीस्थितीत फडणवीस मुख्यमंत्री होण्याची शक्यता फारच कमी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

दुसरीकडे शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. काही लोक पुन्हा येईन, पुन्हा येईन असे म्हणत होते. पण, लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे त्यांची परिस्थिती अशी झाली की, आता मला घरी जाऊ द्या. आता 12 वाजले आहेत अशा शब्दात ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली होती.