लोकसभेचे बिगुल वाजले आहे. राजकीय पक्षांनी अनेक जागांवर आपआपले उमेदवार जाहीर केले आहेत. तरीही अनेक जागांवरील उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम आहे. जळगाव लोकसभेवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून कोणालाही अद्याप अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. एकीकडे भाजपाने जळगाव आणि रावेर दोन्ही लोकसभा जागांवर उमेदवार घोषीत केले आहेत. मात्र या दोन्ही जागांवर महाविकास आघाडीने अद्याप कोणताही उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे या जागांवर कोणाला संधी मिळणार याचा सस्पेन्स कायम राहीला आहे. या जागेवर वेट अँड वॉच कशासाठी ? असा सवाल केला जात आहे.
जळगाव लोकसभा मतदार संघात भाजपाने स्मिता वाघ यांना तर रावेरमधून रक्षा खडसे यांना तिकीट दिले आहे. या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाने अद्यापही आपला अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नाही. जळगाव लोकसभा मतदार संघाची जागा शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला आली आहे. या ठिकाणी भाजपमधून ठाकरे गटात प्रवेश केलेल्या अमळनेरच्या ॲड.ललिता पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने, कुलभूषण पाटील आदींच्या नावाची चर्चा आहे. भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील तसेच माजी खासदार ए.टी नाना पाटील हे देखील लोकसभेसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे जळगाव लोकसभेतून नेमके कोणाला संधी मिळणार या विषयी उत्सुकता लागली आहे.
भाजपमध्ये नाराज असलेली मंडळी त्यांच्यावर अन्याय झाल्यामुळे उद्धव ठाकरे गटाशी संपर्क करत आहेत. भाजपमधून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले आजी माजी खासदार यांच्या महाविकास आघाडीत येण्याच्या शक्यतेमुळेच शिवसेना ठाकरे गट ‘वेट एण्ड वॉच’ च्या भूमिकेत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. भाजपातील नाराज झालेली मंडळी पक्षातील नेत्यांशी संपर्क करीत आहेत. जळगाव लोकसभेसाठी उमेदवारीसाठी अनेक जण भेटी घेत असल्याचे शिवसेनेचे जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीला बराच अवधी आहे. महाविकास आघाडीच्या नेते मंडळींची वैयक्तिक भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर करण्यात येतील असे संजय सावंत यांनी म्हटले आहे.