दिल्ली : देशात 2024 च्या (Lok sabha Election) लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहे. त्याअनुषंगाने (Congress) कॉंग्रेसची भारत जोडो ही पदयात्रा सुरु आहे तर दुसरीकडे भाजप देखील स्थानिक पातळीवर संघटनात्मक बदल करीत आहे. हे सर्व असले तरी गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेस पक्षाची वाटचाल ही अध्यक्षाविनाच आहे. आता सप्टेंबर महिन्याच्या अखेरीसपर्यंत (Congress President) अध्यक्षपदाची निवड होणार आहे. सध्या पक्षाची धूरा ही सोनिया गांधीवर असली तरी आगामी काळात अध्यक्ष पद कोणाला मिळते हे पहावे लागणार आहे. राहुल गांधी यांच्या नावाला काही नेत्यांचा पाठिंबा आहे तर काही नेते त्यांच्या विरोधात भूमिका घेत आहेत.
लोकसभा निवडणुकांमधील मोठ्या परावभवानंतर राहुल गांधी यांनी नैतिक जबाबदारी स्विकारत अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून अध्यक्ष पदाची सूत्रे ही सोनिया गांधी यांच्याकडे आहेत. आगामी लोकसभा निवडणुका पाहता अध्यक्ष पदाची निवड ही याच महिन्याच्या अखेरीस होणार आहे.
पुढचा अध्यक्ष हा गांधी कुटुंबातला नसल्याचे राहुल गांधी यांनी यापूर्वीच घोषित केले होते. मात्र, आता भारत जोडो दरम्यान पुन्हा त्यांच्या नावाची चर्चा होऊ लागली आहे. याला काही राजकीय नेत्यांचा विरोध असला तरी काहींचा पाठींबाही आहे. असे असतानाच राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या पुढाकाराने राहुल गांधी यांनाच अध्यक्ष करायचे असा ठराव घेण्यात आला आहे.
अध्यक्ष पदाच्या निवडीपूर्वीच कॉंग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाले आहेत .यामध्ये अध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांना पाठिंबा देणारा आणि दुसरा विरोध दर्शवणारा. पठींबा देणाऱ्यांमध्ये छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, मल्लिकार्जुन खर्गे, अजय माकन, पीसीसीचे प्रमुख गोविंदसिंग डोटासरा यांचाही पाठिंबा आहे.
गांधी घरण्याव्यतिरिक्त कॉंग्रेसचा कोणी अध्यक्ष झाला तरी त्यावर नेहरू-गांधी या कुटुंबाचा प्रभाव हा राहणारच आहे. शिवाय सध्या भाजप विरोधी राहुल गांधी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने राहुल गांधीच योग्य राहतील असे रणदीपसिंह सुरजेवाला यांनी सांगितले आहे.
कॉंग्रेसच्या अध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये जर अशोक गेहलोत हे असतील तर मात्र, शशी थरुरही दावा करु शकतील. आणि लोकशाही पद्धतीने जर निवड झाली तर यामध्ये स्पर्धकही वाढतील आणि एक वेगळे नेतृत्व अनुभवयास मिळणार असल्याचे काही कॉंग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.