पुणे : भाजपकडून बारामती लोकसभा मतदार संघातील उमेदवाराची घोषणा करण्यात आली. मागील काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. गेले अनेक दिवस बारामती लोकसभा मतदारसंघात उमेदवारी कोणाला द्यायची यावरुन भाजपमध्ये खल सुरु होता. त्यातच बारामती लोकसभेसाठी आपणच उमेदवार असा दावा दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी अनेकदा केला होता. मात्र त्यांच्याच पक्षातील आमदाराच्या पत्नीला उमेदवारी देत भाजपकडून जानकर यांना डच्चू दिला आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात कोण याबाबत गेली अनेक दिवस तर्कवितर्क लावले जात होते. त्यातच पुण्यात झालेल्या भाजप मेळाव्यात पक्षाध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीची जागा जिंकणारच असा निर्धार केला होता. मात्र तरीही उमेदवार कोण याबाबत निश्चितता नसल्यानं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था होती. या दरम्यान शिवसेनेचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार संजय काकडे यांच्या पत्नी उषा काकडे, कॉंग्रेस नेते हर्षवर्धन पाटील किंवा त्यांच्या पत्नी भाग्यश्री पाटील यांच्यासह आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल किंवा आई माजी आमदार रंजन कुल आदी वेगवेगळ्या नावांची चर्चा सुरु होती. विशेष म्हणजे मागील लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांची दमछाक करणारे दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनीही आपण बारामतीतूनच लढणार अशी भुमिका वेळोवेळी जाहिर केली होती. मात्र आता भाजपने कांचन कुल यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केला आहे.
महादेव जानकरांना डच्चू
2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे आणि महादेव जानकर यांच्यात लढत झाली होती. त्यामध्ये महादेव जानकर यांचा 69 हजार मतांनी पराभव झाला. त्यावेळी जानकर यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या कपबशी या चिन्हावर निवडणूक लढवली होती. त्यानंतर राज्य मंत्रीमंडळात समावेश झालेल्या महादेव जानकर यांनी आपणच पुन्हा बारामती लोकसभेची जागा लढवणार असल्याचं वेळोवेळी जाहीर केलं होतं. ही जागा मिळावी यासाठी त्यांनी भाजपकडे हट्टही धरला होता. मात्र त्यांच्याच राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी देत भाजपनं जानकर यांना डच्चू दिल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळं आता जानकर काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मताधिक्य घटणार की वाढणार ?
2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट, धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न यामुळे तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादीची अक्षरश: कोंडी झाली होती. मात्र बारामती, इंदापूर आणि भोर या विधानसभा मतदारसंघांची साथ मिळाल्याने सुप्रिया सुळे यांचा विजय झाला होता. त्यावेळी दौंडमधून महादेव जानकर यांना तब्बल 25 हजारांचं मताधिक्य मिळालं होतं. तर पुरंदर, खडकवासला मतदारसंघातही जानकर आघाडीवर होते. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत दौंडमध्ये राहुल कुल हे तब्बल 11 हजार 345 मतांनी निवडून आले होते. सद्यस्थितीचा विचार करता दौंडसह मागच्या निवडणुकीप्रमाणेच मताधिक्य घटणार की वाढणार हेही पाहणं महत्वाचं ठऱणार आहे.
कोण आहेत कांचन कुल ?
दौंडचे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना भाजपकडून लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. कांचन कुल यांचे माहेर बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील असून त्या पवार कुटुंबीयांच्या अर्थात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळच्या नात्यातील आहेत. कांचन कुल दौंडमध्ये काही प्रमाणात सक्रिय आहेत. वेगवेगळ्या कार्यक्रमात त्यांचा सहभाग दिसून येतो. त्यांचे पती राहुल कुल हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय निकटचे सहकारी मानले जातात. 2014 साली राष्ट्रीय समाज पक्षाकडून निवडणूक लढवत राहुल कुल यांनी माजी आमदार आणि जिल्हा बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष रमेश थोरात यांचा पराभव केला होता.