रायपूर : छत्तीसगडमध्ये काँग्रेसने भाजपचा सुपडासाफ करत स्पष्ट बहुमत मिळवलं असलं तरी मुख्यमंत्री म्हणून कुणाला संधी द्यायची याचा पेच अजून कायम आहे. या चर्चेत एक नाव सर्वात पुढे आहे आणि ते म्हणजे टीएस बाबा उर्फ त्रिभुवनेश्वर शरण सिंहदेव. ते छत्तीसगडमधील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. राजघराण्यातील असलेले टीएस बाबा अंबिकापूर मतदारसंघातून 40 हजार मतांनी विजयी झाले आहेत. छत्तीसगड विधानसभेत ते आतापर्यंत विरोधी पक्ष नेते होते.
छत्तीसगडच नव्हे, तर काँग्रेसमध्ये सध्या राजस्थान आणि मध्य प्रदेशात मुख्यमंत्रीपदासाठी जी नावं चर्चेत आहेत, त्यापैकी एकही उमेदवार संपत्तीच्या बाबतीत टीएस बाबा यांचा हात धरु शकत नाही. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह यांची सपत्ती सात कोटींपेक्षा अधिक आहे. काँग्रेसचे राजस्थानातील मुख्यमंत्रीपदाचे दावेदार सचिन पायलट यांची संपत्ती सहा कोटी, तर अशोक राजस्थानातील दुसरे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार गहलोत यांची संपत्ती सहा कोटी आहे. पण टीएस बाबा यांची संपत्ती या सर्वांपेक्षा 70 पट जास्त आहे.
राजघराण्यातून असल्यामुळे टीएस बाबा यांना मोठा आदर दिला जातो. त्यांना ‘राजा साहेब’ किंवा ‘हुकूम’ या नावाने बोललं जातं. टीएस बाबा यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात 500 कोटींची संपत्ती दाखवली आहे. यानुसार ते आत्ताच निवडणुका झालेल्या पाच राज्यांमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत.
अंबिकापूरमध्ये नजर जाईल तिथपर्यंत फक्त टीएस बाबा यांचीच संपत्ती दिसते. बंगले, सरकारी इमारती, यात्रेकरुंसाठी धर्मशाळा, रुग्णालये, शाळा अशी कित्येक संपत्ती टीएस बाबा यांच्याच जमिनीवर आहे. एवढा पैसा असूनही टीएस बाबा राहण्यासाठी अत्यंत साधे असल्याचं बोललं जातं. त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं, की लहाणपणी आजोबांसोबत दसरा पाहायला हत्तीवर बसून जायचो. कार्यक्रमासाठी राजमहलातून हत्ती निघायचा, असं ते म्हणाले होते.
एडीआरच्या आकडेवारीनुसार, टीएस बाबा यांची संपत्ती 500 कोटी आहे. पण ते स्वतःच म्हणतात की एकूण संपत्ती किती असेल त्याचा मलाही अंदाज नाही. त्यांच्या मते, हे सर्व कागदोपत्री आकडे आहेत. टीएस बाबा यांची संपत्ती एक हजार कोटींपेक्षाही जास्त असल्याचं बोललं जातं.
निवडणूक प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार, टीएस बाबा यांच्याकडे एक कोटींपेक्षा अधिक किंमत असलेल्या पाच कार आहेत. यामध्ये मर्सिडिज, ऑडी ह्युंडाई वर्ना, महिंद्रा एक्सयूव्ही आणि होंडा सिविक यांचा समावेश आहे. याशिवाय त्यांना शस्त्रांचीही आवड आहे.