मुंबई | 16 जुलै 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आज अचानक वेगवान घडामोडी घडल्या. अजित पवार गटाने यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासह सर्व मंत्री शरद पवार यांच्या भेटीला गेले होते. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही अनपेक्षित अशी घटना असल्याचे सांगितले आहे. तर, अजित पवार गट सत्तेत सामील झाल्याने विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त झाले आहे. त्यामुळे हे पद कुणाकडे जाणार यावरही मोठे भाष्य केले आहे.
अजित पवार यांच्या गटाने काही भूमिका घेतली असली तरी आमची भूमिका स्पष्ट आहे. ते सत्तेत सहभागी झाले मात्र आम्ही विरोधी पक्षातच बसणार आहोत. तसे पत्र आम्ही विधासभा अध्यक्ष यांना दिले आहे. आमची बैठक व्यवस्था स्वतंत्र व्हावी अशी आम्ही मागणी केली आहे त्यानुसार ते निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे असे जयंत पाटील म्हणाले.
विधानसभेत विरोधी पक्षनेता कोण व्हावा याबाबत काँग्रेस, शिवसेना आणि आमची चर्चा झाली आहे. आमच्यासोबत 19 ते 20 आमदार आहेत. काही आमदारांनी आम्हाला फोन केला. तर, आम्ही स्वतःहून काही आमदारांना संपर्क केला. त्यांची मनापासून शरद पवार यांच्यासोबत रहाण्याची इच्छा आहे. त्यामुळे सभागृहात ही संख्या निश्चित होईल असेही त्यांनी सांगितले.
जे काही जण तिकडे गेले तरी ते राष्ट्रवादीचेच आहेत असे म्हणत आहेत. पण, आम्ही विरोधी पक्षात आहोत. त्यामुळे आता तरी कागदावर आमचाच पक्ष मोठा आहे. मात्र, आमची संख्या ही काँग्रेसपेक्षा कमी असेल तर विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी काँग्रेसकडे देऊ.
आमच्याकडे जरी विरोधी पक्षनेते पद दिले तरी विरोधी पक्षाचे सहकार्य आवश्यक असते. त्यामुळे यासंदर्भांत आम्ही अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करू असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.