भाजपने अजितदादा गटाला राज्यसभेची एक जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अजितदादा यांच्या गटाचं संसदेतील एकूण संख्याबळ तीन होणार आहेत. सुनील तटकरे हे लोकसभेत आहेत. तर प्रफुल्ल पटेल हे राज्यसभेत आहेत. त्यात आता आणखी एका खासदाराची भर पडणार आहे. पण पक्षात कुणाला राज्यसभा द्यायची यावरून माथापच्ची सुरू आहे. सुनेत्रा पवार यांना राज्यसभा देऊन त्यांचं पुनर्वसन करावं असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. तर पार्थ यांना संधी द्यावी असं पक्षातील एका गटाचं म्हणणं आहे. तर आणखी एका गटाला छगन भुजबळ यांना राज्यसभेत पाठवून पक्षाचा आवाज बुलंद करावा असं वाटतंय. त्यामुळे आता अजितदादा बायको, मुलगा की छगन भुजबळ? कुणाला राज्यसभेची संधी देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आज दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी ते राज्यसभेच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्याची शक्यता आहे. कारण राज्यसभेची उमेदवारी भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला आजच उमेदवाराच्या नावाची घोषणा करावी लागणार आहे. राष्ट्रवादीत राज्यसभेच्या नावाच्या स्पर्धेत सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि छगन भुजबळ आहेत. या तिघांपैकी एकाला राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. अजितदादा या तिघांपैकी एकाला उमेदवारी देतात की अन्य कुणाला याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, या स्पर्धेत सुनेत्रा पवार आघाडीवर असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर वर्णी लागणार असल्याची शक्यता अधिक आहे. राज्यभरातील आमदारांनी अजित पवार यांना पत्र लिहून सुनेत्रा पवार यांनाच राज्यसभेवर पाठवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे अजितदादा काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्यानंतर बारामतीच्या काठेवाडी गावातील ग्रामस्थ आणि सरपंच एकवटले होते. त्यांनी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर घेऊन त्यांना केंद्रात मंत्री करावं, अशी मागणी या गावकऱ्यांनी केली होती. सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर घेतल्यास बारामतीच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात पक्षाला बळ मिळेल. कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी ऊर्जा मिळेल. चार महिन्यांवर विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात पत राखण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातूनच राज्यसभेवर नियुक्ती झाली पाहिजे, असं स्थानिकांचं म्हणणं आहे.
दोन दिवसांपूर्वी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीत एक महत्त्वाचा ठराव करण्यात आला आहे. सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर संधी देण्याचा ठराव करण्यात आल्याची माहिती पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी दिली आहे.