मुंबई : शिवसेना (Shiv Sena) आणि शिंदे गट या दोघांकडूनही धनुष्यबाण या चिन्हावर दावा करण्यात येत आहे. आज शिवसेनेच्या वतीने निवडणूक आयोगाकडे (Election Commission) प्रतिज्ञापत्र सादर करण्यात येणार आहे. धनुष्यबाण नेमका कोणाचा यावर ठाकरे आणि शिंदे गटाच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. शिंदे गटाचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी देखील आता यामध्ये उडी घेतली असून, कायद्यानुसार धनुष्यबाण आमचाच आहे असा दावा अब्दुल सत्तार यांनी केला आहे. आमच्याकडे 40 आमदार, 12 खासदार आहेत. जिल्हाप्रमुखांची संख्या देखील आमच्याकडे अधिक आहे. कार्यकर्त्यांचा पाठिंबा आहे. त्यामुळे कायद्यानुसार धनुष्यबाण हे चिन्ह आम्हालाच मिळायला हवं असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्य सरकारच्या शंभर दिवसांवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. आतापर्यंत जितके सरकार आले त्या सरकारच्या तुलनेत गेल्या शंभर दिवसांत आम्ही प्रभावी काम केल्याचं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारने गोरगरिबांच्या हिताच्या योजना शंभर दिवसात आणल्या, पाणी व कृषी विभागासह इतर विभागांना शंभर दिवसांत मोठा निधी उपलब्ध करून दिला असा दावाही मंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे.
दरम्यान दुसरीकडे शिंदे गटाचे आणखी एक नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी देखील धनुष्यबाण आम्हालाच मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. आमच्याकडे नगरसेवक, जिल्हाप्रमुख, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य एवढेच नव्हे तर सरपंचांचे सुद्धा बहूमत आहे. निवडणूक आयोगाने जर बहुमताचा मुद्दा लक्षात घेतला तर धनुष्यबाण आमचाच असेल असा दावा दीपक केसरकर यांनी केला आहे.