बंगळुरू : कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अखेर फैसला झाला आहे. 5 दिवसांच्या चर्चेअंती काँग्रेसने सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला आहे. सिद्धरामय्या हे कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री असतील तर डी के शिवकुमार हे उपमुख्यमंत्री असतील असा निर्णय काँग्रेसच्या पक्षाध्यक्षांनी घेतला आहे. पण कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आणखी एक नाव होतं ते म्हणजे डी के शिवकुमार… डी के शिवकुमार हे मुख्यमंत्रिपदाचे तगडे दावेदार मानले जात होते. पण त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद दिलं गेलं नाही. त्याची कारणं काय आहेत? पाहूयात…
काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी जरी हा निर्णय घेतला असला तरी या सगळ्यानंतर डी के शिवकुमार यांची भूमिका गुलदस्त्यात आहे. त्यांनी आजच काँग्रेसला एक इशारा दिला होता. सिद्धरामय्या यांनी याआधी कर्नाटकचं मुख्यमंत्रिपद भुषवलं आहे. त्यामुळे यंदा मला संधी देण्यात यावी, अन्यथा मी केवळ एक सामान्य आमदार म्हणून काम करेन, असं डी के शिवकुमार म्हणाले होते. त्यांच्या या एका वाक्याने काँग्रेसमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं मात्र हा तिढा काँग्रेसने सोडवला अन् सिद्धरामय्या यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घातली.
डी के शिवकुमार हे कर्नाटकमधले सर्वात श्रीमंत राजकारण्यांपैकी एक आहेत. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणातही त्यांची चौकशी झाली. सीबीआय, ईडी आणि आयकर विभाग त्यांची चौकशी करत आहे. कर्नाटक निवडणुकीआधी 104 दिवस ते तुरुंगात होते. आता सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. त्यांच्याकडे 840 कोटींहून अधिकची संपत्ती आहे. जेव्हा-जेव्हा काँग्रेस पक्षाला निधीची गरज भासते, तेव्हा शिवकुमार तिथे खंबीरपणे उभे राहतात. त्यामुळेच त्यांना काँग्रेसचं ‘संकटमोचक’ म्हटलं जातं.
डी. के. शिवकुमार यांना सीमीत जनाधार असल्याचं बोललं जातं. डी. के. शिवकुमार हे वोक्कालिगा समाजातून येतात. वोक्कालिगा समाजावर त्यांची चांगली पकड आहे. मात्र इतर समाजातील लोकांवर डी. के. शिवकुमार यांचा जास्त प्रभाव नाहीये. त्याच्या विरूद्ध पाहिलं तर सिद्धरामय्या यांना सर्व जातीजमातीचा पाठिंबा असल्याचं दिसतं.
डी. के. शिवकुमार यांनी काँग्रेसला निवडून आणण्यासाठी मेहनत घेतली. पण आमदारांचा त्यांना पुरेसा पाठिंबा नाहीये. आमदारांचं समर्थनि मिळवण्यात डी. के. शिवकुमार मागे पडले. तसंच अनुभवाच्या बाबतीत सिद्धरामय्या उजवे ठरल्याने त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली अन् डी के शिवकुमार या शर्यतीत मागे पडले.