नवी दिल्ली : खासदार नवनीत राणा यांनी आज नवी दिल्लीत (New Delhi) पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, महाराष्ट्राच्या लाचार मुख्यमंत्र्यांची लाचार सभा कालची होती. यावेळी त्यांनी शेतकरी, बेरोजगारी, राज्यातील भारनियमन यावर शब्दही बोलले नाही. अडीच वर्ष सीएम कार्यालयात (CM Office) गेले नाही. याच कालावधीतील विदर्भातील एखाद्या दौऱ्याचा एक व्हिडीओ त्यांनी दाखवावा. हे काय आहे. 2019 नंतर तीनपट बेरोजगारी वाढली आहे. युवकांना किती रोजगार दिला, याचा हिशोब मुख्यमंत्र्यांनी द्यावा. राणा म्हणाल्या, एका खासदारानं मुख्यमंत्र्यांना गदा भेट दिली. पण, मुख्यमंत्र्यांनी तो गदासुद्धा उचलला नाही. हात लावून बाजूला केला. खरं, तर गदा हातात घेतल्यानंतर त्याचा सन्मान केला जातो. त्यानंतर दुसऱ्याकडं दिला जातो. ही आमची संस्कृती (Culture) आहे, याचा अपमान मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
नवनीत राणा यांनी औरंगाबादच्या नामांतरणावरुन पुन्हा मुख्यंमंत्र्यांना डिवचलं. त्या म्हणाल्या, संभाजी महाराज यांचा अभिवादन करण्याचा कालचा दिवस होता. औरंगाबाद नाव संभाजी नगर ठेवणार असल्याचं शिवसेनेनं अजेंड्यात सांगितलं होतं. आता म्हणतात, याची आवश्यकता काय? नगराचं नाव बदलू शकत नाही. इतके लाचार मुख्यमंत्री झाले आहेत. नाव बदललं तर, काही पक्ष आमच्यापासून दूर जातील, अशी भीती त्यांना वाटत आहे. ही भीती त्यांच्या मनात आहे. बाळासाहेब ठाकरेंनी काश्मिरातील 370 कलम हटावं, यासाठी मागणी केली होती. ती मागणी भाजप सरकारनं पूर्ण केली.
नवनीत राणा म्हणाल्या, सीएम म्हणतात, हनुमान चालिसा म्हणणारे कुठं गेले. ते कदाचित बातम्या पाहत नसतील. ते अॅक्टिव्ह नसतील. जसं तुम्ही सुपूत्र असाल, तसं मीसुद्धा महाराष्ट्राची मुलगी आहे. महाराष्ट्रातील कोणताही व्यक्ती पळत नाही. ते लढतात. तुम्ही म्हणता, काश्मिरात हनुमान चालिसा वाचा. यातून हे स्पष्ट होते की, हनुमान चालिसाचा विरोध मुख्यमंत्री करतात. काश्मिरात मी हनुमान चालिसा वाचू शकते, तर मग महाराष्ट्रात हनुमान चालिसा का वाचू शकत नाही, याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे. हनुमान चालिसा आम्ही आमच्या विकासासाठी नव्हे, तर राज्याच्या विकासासाठी केलं होतं. संकट आल्यानंतर संकट मोजनची आठवण होते, असंही त्यांनी सांगितलं.