अक्षय मंकनी, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, कर्जत | 30 नोव्हेंबर 2023 : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नाव नेहमीच पंतप्रधानपदासाठी घेतलं जातं. शरद पवार यांनी पंतप्रधान व्हावं असं देशातील जनतेचंही मत आहे. एवढंच नव्हे तर शरद पवार यांना पंतप्रधानपदाची संधीही आली होती. पण पवार यांनी ही संधी घेतली नाही. हातात असूनही पवार यांनी संधी साधण्यास नकार दिला होता. पवार यांनी ही संधी का घेतली नाही? याचा मोठा खुलासा राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. कुणालाही माहीत नसलेली गोष्ट प्रफुल्ल पटेल यांनी पहिल्यांदाच शेअर केली आहे.
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचं कर्जत येथे अधिवेशन सुरू आहे. त्याला संबोधित करताना प्रफुल्ल पटेल यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावे तसेच शरद पवार पंतप्रधान व्हावे ही आमची इच्छा होती. नरसिंह राव यांना हटवण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न केले होते. परंतु त्यावेळी राव यांनी सीताराम केसरींना काँग्रेसचे अध्यक्ष केलं. त्यानंतर एचडी देवेगौडा पंतप्रधान झाले. पण सीताराम केसरी यांनी देवेगौडा यांचा पाठिंबा काढून घेतला. 145 पेक्षा जास्त खासदार शरद पवार यांच्या घरी आले. तुम्ही केसरींना हटवा अशी विनंती सर्वांनी केली. त्यावेळी देवेगौडा यांचा मला फोन आला. मी त्यांच्या घरी गेलो. तेव्हा देवेगौडा यांनी मी राजीनामा देतो, पण केसरींना हटवा. शरद पवार यांना भूमिका घ्यायला सांगा असा मला निरोप दिला, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
त्यानंतर मी लगेच शरद पवार यांना भेटलो. आपल्याला मोठी संधी आहे. तुम्ही भूमिका घ्या, अशी गळ मी शरद पवार यांना घातली. त्यावर पवार यांनी 15 मिनिटात बैठक संपवून नंतर बोलू असं म्हणत आलेली सुवर्णसंधी घालवली. काय झालं हे मला कळलं नाही. पण शरद पवार पंतप्रधान झाले नाहीत. ते पंतप्रधान झाले नाहीत याची खंत माझ्या मनात कायम आहे, असंही ते म्हणाले.
आपल्या बाबत सध्या चुकीची माहिती पसरवली जातेय. परंतु मी सांगतो अजित पवार थेट पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना भेटले. त्यावेळी त्यानी स्पष्ट सांगितलं की, आमची एक विचारधारा आहे. आम्ही त्यात तडजोड करु शकत नाही. नरेंद्र मोदी यांनी देखील आमच्या म्हणण्याला संमती दिली. त्यामुळे विचारधारेच्या बाबतीत कार्यकर्त्यांना घाबरण्याची गरज नाही, असंही त्यांनी सांगितलं.
उद्यापासून डिसेंबर महिना सुरु होतोय. 120 दिवसांत मतदान करण्याची वेळ आली आहे. त्याच्या आधी 2 महिने फॉर्म भरण्यात जाणार आहेत. याचाच अर्थ आता केवळ 100 दिवस निवडणुकीच्या तयारीसाठी उरले आहेत. देशाच्या राजकारणात अजूनही कौल मोदी यांच्या बाजूने आहे. त्यामुळे चिंता करू नका. कामाला लागा, असे आदेशच त्यांनी दिले.