मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका दिला आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जाच थेट रद्द केला आहे. निवडणूक आयोगाची खरंतर ही मोठी कारवाई आहे. एखाद्या प्रादेशिक पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळणं म्हणजे प्रतिष्ठा वाढणं असंच मानलं जातं. निवडणूक आयोगाने आम आदमी पक्षाला राष्ट्रीय दर्जाची मान्यता दिली आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसची मान्यता रद्द केली आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा झटका मानला जातोय. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचा राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यामागील कारणही आता समोर आलं आहे.
नियमांनुसार, राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी पक्षांना एकूण मतांपैकी ठरावीक टक्के मते मिळणे आवश्यकता असते. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तितके टक्के मते मिळालेले नाहीत, अशी चर्चा आहे. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे विजयी उमेदवारांची संख्या कमी झाली होती. त्यामुळेच निवडणूक आयोगाकडून ही मोठी कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसला 2019च्या निवडणुकीत कमी जागांवर यश आलं. त्यानंतर आता ही कारवाई करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला 2014च्या लोकसभा निवडणुकीत 16.12 टक्के मते मिळाली होती. महाराष्ट्रातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघांपैकी 4 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळालं होतं. तर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला 17.24 टक्के मतं मिळाली होती. राज्यात एकूण 288 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी फक्त 41 जागांवर राष्ट्रवादीला यश मिळालं होतं.
त्याचप्रकारे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 15.52 टक्के मतं मिळाली होती. त्यावेळीही राष्ट्रवादीचे चार खासदार निवडून आले होते. पण त्यावेळी 2014 च्या तुलनेत मतांची टक्केवारी कमी झाली. राष्ट्रवादीला त्यावेळी फक्त 15.52 टक्के मते मिळाली होती. तसेच 2019च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला 54 जागांवर यश मिळालेलं. राष्ट्रवादीला त्यावेळी 16.71 टक्के मतं मिळाली होती.
या दोन पंचवार्षिक निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीच्या मतांची टक्केवारी घसरली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला 16.12 टक्के मतं मिळाली होती. पण तीच टक्केवारी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 15.52 टक्क्यांवर पोहोचली होती. हीच गत विधानसभा निवडणुकीतही झाली. 2014च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला मिळालेल्या मतांची टक्केवारी ही 17.24 टक्के इतकी होती. पण 2019 मते ही टक्केवारी घसरली. 2019च्या विधानसभेत राष्ट्रवादीचे आमदारांची संख्या जरी वाढली तरी मतांची टक्केवारी घसरली. राष्ट्रवादीला 2019च्या विधानसभा निवडणुकीत केवळ 16.71 टक्के मिळाली.