मुंबई : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे महाविकास आघाडीतील नेत्यांकडून मुंडेंची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठराखण होताना दिसत आहे, तर दुसरीकडे भाजपने धनंजय मुंडेंच्या सामाजिक न्याय मंत्रिपदाच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जोर धरला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल दुपारी धनंजय मुंडेंवरील आरोप गंभीर स्वरुपाचे असल्याचे सांगत कारवाईचे स्पष्ट संकेत दिले होते. परंतु रात्री उशिरा राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत धनंजय मुंडेंचा तूर्तास राजीनामा न घेण्यावर एकमत झाले. त्यामुळे सात-आठ तासात असं काय घडलं? राष्ट्रवादीने धनंजय मुंडेंवरील कारवाई का टाळली? असे प्रश्न विचारले जात आहेत. (Why NCP avoided action against Dhananjay Munde in alleged Rape Case)
ओबीसी समाजाचा मोठा नेता म्हणून धनंजय मुंडेंची ओळख आहे, राष्ट्रवादीचे ते धडाडीचे नेते आणि प्रचारक आहेत. सामाजिक न्याय मंत्रिपदाची धुरा खांद्यावर घेतल्यापासून दर महिन्याला कामाचा अहवाल देणारे ते एकमेव मंत्री आहेत. कालही जनता दरबारला उपस्थित राहून त्यांनी जनता आणि कामाच्या प्रती आपली तळमळ दाखवली. स्वच्छ प्रतिमेमुळे धनंजय मुंडेंवरील कारवाई तूर्त टळल्याचं दिसतं.
धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करणारी रेणू शर्मा (Renu Sharma) संशयाच्या भोवऱ्यात सापडल्यामुळे धनंजय मुंडेंची बाजू मजबूत झाली. रेणू शर्मा यांनी पोलिसांकडे जाऊन रितसर तक्रारही नोंदवल्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या होत्या. मात्र गुरुवारी दुपारच्या सुमारास भाजप नेते कृष्णा हेगडे यांच्या खळबळजनक गौप्यस्फोटानंतर हे चित्र पूर्णपणे पालटले. रेणू शर्मा यांनी आपल्यालाही हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप हेगडे यांनी केला. त्यानंतर मनसे नेत्यानेही अशाच प्रकारचा आरोप केला आणि धनंजय मुंडेंच्या दाव्याला बळ मिळत गेलं.
रेणू शर्मा यांनी आणखी काही नेत्यांना अशाचप्रकारे ब्लॅकमेल केल्याचे आरोप होत आहेत. शरद पवार यांनी या प्रकरणाची माहिती घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीने पोलिसांच्या पुढील तपासापर्यंत थांबण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी धनंजय मुंडे यांना तूर्तास राजीनामा द्यावा लागणार नाही. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावरील राजकीय गंडांतर टळल्याचे मानले जात आहे.
ज्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापनेच्या हालाचाली सुरु होत्या, त्यावेळी अभूतपूर्व चित्र पाहायला मिळालं होतं. सत्तेचं समीकरण जुळलं असताना अजित पवारांनी अचानक देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाऊन पहाटेच शपथविधी उरकला होता. त्यावेळी अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे काही आमदार दिसले होते. मात्र पहाटेच्या शपथेनंतर राष्ट्रवादीचा आणखी एक बडा नेता दिवसभर गायब होता, तो नेता म्हणजे धनंजय मुंडे. अजित पवार हे धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असल्यामुळे त्यांना पवारांकडून तूर्त अभय मिळाल्याचीही चर्चा आहे.
धनंजय मुंडे यांच्यावरती बोलताना भाजपच्या नेत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आक्रमक होत धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला. राजीनामा दिला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरु, असा इशारा त्यांनी दिला. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी मुंडे यांच्या प्रकरणी सावध प्रतिक्रिया दिली. “धनंजय मुंडे यांनी कबुली दिली आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. चौकशी झाल्यावरच आम्ही आमची भूमिका स्पष्ट करु” असं म्हणत फडणवीसांनी आश्चर्यकारक भूमिका घेतली. भाजपचा एक गट राजीनाम्यासाठी आग्रही असला, तरी खुद्द विरोधीपक्ष नेत्यांच्या सावध भूमिकेमुळे राष्ट्रवादीनेही वेट अँड वॉच भूमिका घेतल्याचं दिसतं.
रेणू शर्मा यांचे वकील रमेश त्रिपाठी यांच्यावरही विनयभंगाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती सोशल मीडियावरॉ व्हायरल होत आहे. त्यांच्यावर 2018 साली वाशीच्या एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे. आपल्या महिला असिस्टंट वकिलाचा विनयभंग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांच्यावर कलम 354 (अ) अन्वये गुन्हा दाखल असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांचं पारडं तूर्तास जड दिसत आहे. (Why NCP avoided action against Dhananjay Munde in alleged Rape Case)
धनंजय मुंडे यांच्याकडून पक्ष तूर्तास कुठलाही राजीनामा घेणार नाही, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आम्ही केली आहे. मागच्या काळात धनंजय मुंडे त्रासात होते. पोलिसांनी या प्रकरणाची योग्य चौकशी करावी, जो दोषी असेल, त्याच्यावर कारवाई करावी, धनंजय मुंडे दोषी आढळले, तर पक्ष कारवाई करेल, मात्र कोणी कुठल्याही निष्कर्षावर येऊ नये, असं जयंत पाटलांनी स्पष्ट केलं.
“धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांचं स्वरुप गंभीर आहे. पक्ष आणि पक्षप्रमुख म्हणून आम्ही चर्चा करुन योग्य निर्णय घेऊ. त्याचवेळी कोणावरही अन्याय होणार नाही हे सुद्धा पाहू” असं शरद पवार म्हणाले. यावेळी शरद पवारांना मुख्यमंत्र्यांची काय भूमिका आहे असंही विचारण्यात आलं. त्यावेळी शरद पवारांनी रोखठोक भाष्य केलं. मला आधी माझा निर्णय घेऊ द्या, नंतर मुख्यमंत्र्यांचं बघू. आम्हाला आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करुन पुढची भूमिका काय असावी, याचा विचाराने निर्णय होईल, असं शरद पवार म्हणाले.
संबंधित बातम्या :
धनंजय मुंडे प्रकरणात 51 तासात काय घडले?, वाचा 14 मोठ्या घडामोडी…
…तर दहा वर्षापूर्वीच माझाही धनंजय मुंडे झाला असता, मनसेच्या मनीष धुरींचाही रेणू शर्मावर गंभीर आरोप
(Why NCP avoided action against Dhananjay Munde in alleged Rape Case)