मुंबई : आपण शासकीय कार्यक्रमांना हजेरी लावत नसल्यामुळेच ठाकरे मंत्रिमंडळ विस्तार आणि शपथविधीच्या कार्यक्रमाला अनुपस्थित होतो, असं स्पष्टीकरण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलं आहे. बंधू सुनिल राऊत यांना मंत्रिपद नसल्याने संजय राऊत नाराज असल्याच्या चर्चा (Sanjay Raut Oath Ceremony absent) होत्या.
‘मी शासकीय कार्यक्रमांना जात नाही, त्यामुळेच गैरहजर होतो. इतक्या वर्षात मी शक्यतो कोणत्याही कार्यक्रमाला गेलेलो नाही’ असं संजय राऊत म्हणाले. त्यावर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला उपस्थित राहिल्याबद्दल पत्रकारांनी त्यांना विचारलं. तेव्हा, उद्धव ठाकरेंचा शपथविधी अपवाद होता, ते राज्याचे मुख्यमंत्री झाले होते, असं राऊतांनी सांगितलं. मंत्रिमंडळ विस्तारावर कोणतीही नाराजी नसल्याचं संजय राऊत म्हणाले.
चहापानावर बहिष्कार टाकणं ठीक आहे, पण शपथविधीवर बहिष्कार टाकण्याची पद्धत चुकीची आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. ‘विरोधीपक्षाची जनतेशी बांधिलकी आहे. त्यांनी अशाप्रकारे बहिष्काराचं शस्त्र वारंवार उपसून बोथट करु नये. अन्यथा जनतेचा विरोधीपक्षावरील विश्वास उडून जाईल’ असंही राऊत पुढे म्हणाले.
संजय राऊतांचा शिवसेना इच्छुकांना सबुरीचा सल्ला
विरोधपक्ष सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेतून बाहेर पडण्यास तयार नसेल तर ही दुसऱ्या कोणालातरी ही पोकळी भरुन काढावी लागेल, असं संजय राऊत म्हणाले.
8 तारखेला (8 जानेवारी 2020) औद्योगिक बंद पुकारण्यात आला असून शिवसेनेचा पाठिंबा असल्याचं संजय राऊत यांनी जाहीर केलं. देशात बेरोजगारी वाढली आहे. आर्थिक कणा मोडला आहे, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली. कामगार संघटनांचे नेते शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना भेटून आंदोलनाची व्याप्ती वाढावी यासाठी काम करतील अशी माहितीही त्यांनी दिली.
याआधी, मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झालेल्या शिवसेनेतील इच्छुकांना संजय राऊत यांनी सबुरीचा सल्ला दिला होता. तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये सामावून घेण्यास प्रत्येकाला जागा नसल्याचं राऊतांनी सांगितलं होतं. एकप्रकारे संजय राऊत यांनी नाराज बंधू सुनिल राऊत यांना समजवल्याचं म्हटलं जात होतं.
‘लोकांनी समजून घ्यायला हवं, की तीन पक्षांचं सरकार असल्यामुळे आमच्याकडे फारसे पर्याय उपलब्ध नाहीत. तिन्ही पक्षात पात्र व्यक्ती आहेत. आमच्या लोकांनी थोडा संयम बाळगायला हवा. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत, हीच आनंदाची गोष्ट आहे’ असं संजय राऊत म्हणाले होते.
Sanjay Raut Oath Ceremony absent