सातारा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पार्थ पवारला निवडून आणण्याची खरोखरच इच्छा होती, तर मग त्यांनी पार्थला बारामतीतून उमेदवारी का दिली नाही? असा प्रश्न भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विचारला. चंद्रकांत पाटील यांनी महाबळेश्वर येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी पवारांवर टीकास्त्र सोडलं.
शरद पवारांना त्यांच्या पक्षात त्यांचीच घराणेशाही चालवायची आहे. म्हणून त्यांनी बारामतीतून स्वत:ची मुलगी सुप्रिया सुळे यांना उमेदवारी दिली, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे या बारामतीतून निवडून आल्या. मात्र मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांचा पराभव झाला. शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांचा पराभव केला.
या निकालावरुन चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवरच निशाणा साधला. पार्थ पवार यांची पहिलीच निवडणूक होती, तर सुप्रिया सुळे यांनी यापूर्वी निवडणुका लढल्या आहेत. त्यामुळे “शरद पवारांना जर पार्थ पवारला निवडून आणायचं असतं, तर त्यांनी पवारांचा हुकमी असलेला बारामती मतदारसंघातून उमेदवारी दिली असती. पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी स्वत:ची मुलगी सुप्रिया सुळेंना बारामतीतून तिकीट दिलं आणि पार्थ पवारांना मावळमधून लढण्यास सांगितलं” असं चंद्रकांत पाटील यांनी नमूद केलं.
लोकसभा निवडणुकीदरम्यान चंद्रकांत पाटील हे बारामतीत तळ ठोकून होते. भाजपने या मतदारसंघात कांचन कूल यांना उमेदवारी दिली होती. कूल यांना निवडून आणण्यासाठी भाजपने अटोकाट प्रयत्न केला. मात्र सुप्रिया सुळेंनी त्यांचा जवळपास लाखभर मतांनी पराभव केला.
संबंधित बातम्या
अजितदादांची कामं पाहता बारामतीत त्यांचा पराभव करणं निव्वळ आशावाद : चंद्रकांत पाटील
बारामती : पार्थला निवडणुकीत आणून अजित पवार फसलेत : चंद्रकांत पाटील
‘चंद्रकांत पाटलांनी बारामतीतून निवडणूक लढून दाखवावी’
प्रचंड यंत्रणा राबवूनही मिशन बारामती फेल, पवारांचा बालेकिल्ला अभेद्य कशामुळे?