मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आज (14 जानेवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. मुंबईतील वाडिया रुग्णालय अनुदानाअभावी बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्याप्रकरणी सरकारने तातडीने मदत करावी आणि रुग्णालय बंद होऊ नये या मागणीसाठी शर्मिला ठाकरेंनी अर्थमंत्री असलेल्या अजित पवार यांची भेट घेतली. विशेष म्हणजे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट न घेता उपमुख्यमंत्री पवारांची भेट घेतली (Reason of Sharmila Thackeray meet Ajit Pawar). त्यानंतर शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट का घेतली नाही, असाही प्रश्न विचारला गेला. यावर शर्मिला ठाकरे यांनीच थेट उत्तर दिलं.
अजित पवार यांच्या भेटीनंतर शर्मिला ठाकरे यांनी पत्रकारांना या भेटीची माहिती दिली. त्या म्हणाल्या, ““अजित पवार स्वतः अर्थमंत्री आहेत. वाडिया रुग्णालयासाठी जी काही तरतूद करायची आहे ती अर्थमंत्री म्हणून त्यांच्याच हातात आहे. तेच ही तरतूद करु शकतात. म्हणूनच आम्ही अजित पवार यांचीच वेळ घेऊन त्यांची भेट घेतली.”
अजित पवार यांनी वाडियासाठी 46 कोटी रुपये देण्याचं मान्य केलं आहे. राज्य सरकार आणि महापालिका मिळून हे पैसे देतील. अजित पवार यांनी शब्द दिलेला आहे. त्यामुळे लवकरच हा प्रश्न सुटेल. कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर गोष्टींसाठी 105 कोटी रुपये बाकी आहेत. त्यावरही लवकरच निर्णय होईल, असंही शर्मिला ठाकरे यांनी नमूद केलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट झाली आहे का, त्यांची वेळ घेतली आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली नाही. तसेच त्यांच्या भेटीसाठीही वेळ घेतलेला नसल्याचं शर्मिला ठाकरे यांनी स्पष्ट केलं. त्या म्हणाल्या, “अजित पवार हेच अर्थमंत्री आहेत. हा विषय आर्थिक तरतुदीचाच आहे. त्यामुळे आम्ही केवळ अजित पवार यांचाच वेळ घेतला आणि भेटून निधीची मागणी केली.”
“वाडिया रुग्णालय बंद झालं तर गोरगरिबांनी उपचारासाठी जायचं कुठे? महापालिका आणि संबंधित मंत्र्यांनी तातडीने बैठक घेऊन यावर तोडगा काढावा. काहीही झालं तरी हे रुग्णालय आम्ही बंद होऊ देणार नाही.” – सौ. शर्मिला राज ठाकरे. pic.twitter.com/ynUp8jQTkZ
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) January 13, 2020
दरम्यान, शर्मिला ठाकरे यांनी सोमवारी (13 जानेवारी) वाडिया कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भेट देऊन त्यांचीही बाजू समजून घेतली होती.
VIDEO: