लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या निकालानंतर उत्तर प्रदेशच्या फैजाबाद मतदारसंघाची चर्चा होत आहे. याचे कारण म्हणजे अयोध्या आणि राम मंदिर याच मतदार संघात येत आहे. या मतदार भाजपचा झालेल्या पराभवाबाबत सोशल मीडियावर अनेक दावे केले जात आहेत. मात्र, अयोध्येतील भाजपच्या पराभवाचे कारण अखेर समोर आले आहे. येथे झालेल्या पराभवाचा पक्षाने आढावा घेतला. या आढावा अहवालातून एक मोठे कारण समोर आले आहे. रामनगरीतील पराभवाचे कारण फैजाबादमधील भाजपचे उमेदवार आणि माजी खासदार लल्लू सिंह यांचे वक्तव्य आहे. त्यामुळेच पक्षाचे मोठे नुकसान झाल्याचे या अहवालात म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीत 2024 मध्ये भाजपच्या बहुमतापासून दूर राहण्यापेक्षा फैजाबाद जागेवरील पक्षाच्या पराभवाची अधिक चर्चा झाली. रामनगरीत पराभवामागे फैजाबादमधील भाजप उमेदवार आणि माजी खासदार लल्लू सिंह यांच्या वक्तव्यामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. लल्लू सिंह यांनी संविधान बदलण्याबाबत विधान केले होते. त्यामुळे दलित मते भाजपकडून गमावली गेल्याचे अहवालात म्हटले आहे.
लल्लू सिंह यांनी भाजपच्या 400 पार करण्याच्या नाऱ्याबाबत स्पष्टीकरण देताना घटना दुरुस्तीबाबत एक विधान केले. त्यांचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला. ज्यामध्ये ते ‘272 चे सरकार बनते. पण 272 चे सरकार संविधानात दुरुस्ती करू शकत नाही. नवीन संविधान बनविण्यासाठी दोन तृतीयांशपेक्षा जास्त बहुमत आवश्यक आहे. त्यांच्या या विधानामुळे कुर्मी आणि मौर्य मतांना मोठा धक्का बसला आणि त्यांनी भाजप विरोधात मतदान केले.
भाजपच्या पुनरावलोकन अहवालात लल्लू सिंह यांचे हे विधान पक्षासाठी घातक मानले गेले आहे. त्यांच्या या विधानामुळे भाजप दलित मतदारांमधील आरक्षण रद्द करत असल्याच्या विरोधी पक्षांच्या दाव्याला बळ मिळाले असे म्हटले आहे. यासोबतच पेपरफुटीसारखे मुद्देही महत्त्वाचे कारण असल्याचे सांगण्यात आले. उत्तर प्रदेशातील तरुणांमध्ये पेपरफुटी ही मोठी समस्या म्हणून समोर आली होती.