मुंबई: निवडणुकीनिमित्त देशभरात सध्या राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्यातच सोशल मीडियावरुनही टीका टीपण्णी करण्यात येत आहे. सोशल मीडियावरील कुरघोड्या विकिपीडियापर्यंत पोहोचल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रोफाईलशी कोणीतरी छेडछाड केली. शरद पवारांचा उल्लेख देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा करण्यात आला.
कोणत्यातरी फेक अकाऊंटवरुन शरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलसोबत छेडछाड करण्यात आली. आधी त्यांना देशातील सर्वात भ्रष्ट नेता संबोधण्यात आलं, नंतर पुन्हा त्यात बदल करुन शरद पवारांचा उल्लेख देशातील सर्वात इमानदार नेता असा करण्यात आला. विकिपीडियावरील या माहितीचा स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर, ही माहिती दुरुस्त करण्यात आली.
विकिपीडियावर कोणीही व्यक्ती आपलं अकाऊंट उघडून कोणतीही माहिती अपडेट, एडिट/ दुरुस्त करु शकतो. त्यामुळे यापूर्वीही अनेक सेलिब्रिटींच्या प्रोफाईलशी छेडछाड झाल्याचं उघड झालं आहे.
काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेले रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या प्रोफाईलशीही छेडछाड झाली होती. रणजीतसिंहांना एकाचवेळी तीन पक्षाचे नेते संबोधले होते.
लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी आहे. महाराष्ट्रातील 48 जागांपैकी काँग्रेस 26 तर राष्ट्रवादी 22 जागा लढवणार आहे. दोन्ही पक्ष 2-2 जागा मित्रपक्षांना सोडणार आहेत. महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान होणार आहे. 11, 18, 23 आणि 29 एप्रिल रोजी मतदान तर 23 मे रोजी निकाल असेल.