नवी दिल्ली : विधानसभेच्या (Assembly Election) 7 जागांसाठी पोटनिवडणूक (Election) होत आहे. या निवडणुकीत भाजप (BJP) ताकदीने उतरणार आहे. या सात ही जागांवर विजय मिळविण्याचा चंग बांधूनच भाजप उतरणार आहे. तर विरोधक (Opposition) ही कुरघोडी करण्याच्या बेतात आहेत. आता पारडे कोणाचे जड होते हे पुढच्या महिन्यात स्पष्ट होईल.
पुढील महिन्यात 3 नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र, तेलंगणा आणि ओडिशामधील विधानसभेच्या जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. एकूण सात जागांसाठी भाजप आणि विरोधी पक्षात थेट सामना रंगणार आहे.यामध्ये कोणाचा वरचष्मा राहील हे चित्र लवकरच स्पष्ट होईल.
महागाईच्या आघाडीवर नियंत्रण मिळवण्यात केंद्र सरकारला म्हणावं तितके यश आलेले नाही. केंद्रीय रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवल्याने चाकरमान्यांचा हप्त्यावरील खर्च वाढला आहे. सर्वच बाजूने सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे भाजपसाठी ही पोटनिवडणूक अग्निदिव्य असेल. तर विरोधी गटासाठी ही निवडणूक सोपी राहणार नाही.
सध्या महाराष्ट्रात सत्तांतर झाले आहे. तर बिहार आणि तेलंगणामध्येही परिस्थिती बदलली आहे. या बदललेल्या परिस्थितीचा फायदा नेमका कोणाला होतो? हे येत्या महिनाभरात स्पष्ट होईल. भारतीय जनता पार्टीने हरियाणा, तेलंगणा, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील उमेदवारांची घोषणा केली आहे.
महाराष्ट्रात अंधेरी पूर्वी मतदारसंघात शिंदे गट त्यांचा उमेदवार देणार नाही. तर शिवसेनेला महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे बळ मिळाले आहे. बिहारमध्ये ही महाआघाडीशी भाजपला सामना करावा लागणार आहे. त्यामुळे बदलत्या सत्ता समीकरणात भाजपला विजयश्री खेचून आणायचा आहे.
बिहार मध्ये दोन जागांवर पोट निवडणूक होत आहे. त्यात मोकामा आणि गोपलगंज या जागांचा समावेश आहे. तर महाराष्ट्रात अंधेरी पूर्व, हरियाणामध्ये आदमपूर, तेलंगणामध्ये मुनुगोडे, ओडिशात धामनगर आणि उत्तर प्रदेशात गोला गोरखनाथ या सात विधानसभेच्या पोटनिवडणुका होतील.
पोटनिवडणुकीसाठीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. 14 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना या ठिकाणी नामनिर्देशनपत्र भरता येऊ शकते. 3 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येईल.