बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झालाय. हजारो कार्यकर्त्यांसोबत बैठक केल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्याचा संकल्प केला. शिवाय बीडच्या भाजप उमेदवार डॉ. प्रितम मुंडे यांना साथ देण्याचं आवाहन हजारो कार्यकर्त्यांना केलं. 18 तारखेला पुढील निर्णय जाहीर करणार असल्याचंही ते म्हणाले. विशेष म्हणजे 18 एप्रिल रोजी बीड लोकसभेसाठी मतदान आहे.
राजकीय भूमिका जाहीर केल्यानंतर जयदत्त क्षीरसागर यांनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे. या सरकारच्या काळात बीड जिल्ह्यासाठी भरघोस निधी आलाय. आमची साथ कायम विकासाला होती. त्यामुळे या निवडणुकीत भाजपच्या बीडच्या उमेदवार डॉ. प्रितम मुंडे यांना मदत करुन विजयाची गुढी उभारु, असं या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय.
काय आहे फेसबुक पोस्ट?
#अखेर_लढा_ठरला
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून पक्ष वाढविण्यासाठी आम्ही अपार कष्ट घेतले. आमच्या बीड जिल्ह्यात गावागावापर्यंत पक्ष नेला. सन २००९ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील ६ पैकी ५ जागा ह्या आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस ने लढविल्या होत्या. त्या वेळी ५ पैकी ५ जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या होत्या. पक्ष सर्व स्तरावर आम्ही वाढविला. मात्र बाहेरून पक्षात आलेल्या काही लोकांनी पक्ष हायजॅक करून पक्ष विरोधी भूमिका घेऊन पध्दतशिरपणे पक्ष संपविला. तुलनेने या नवीन सरकार च्या काळात बीड जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात निधी दिलाय. आमचं राजकारण हे कायम विकासासाठी, न्यायासाठी, समाजकारणासाठी आहे. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत युतीच्या उमेदवार डॉ. प्रितम मुंडे यांच्या विजयाची गुडी उभारणार. मोदींना समर्थन देत डॉ. मुंडेंना निर्णायक मतदानाने निवडून आणण्याचा संकल्प आ. जयदत्त क्षीरसागर यांनी आज संकल्प मेळाव्यात केला. आजच्या मेळाव्याला अल्पसंख्याक, मुस्लिम, मराठा आणि ओ बी सी समाजातील जिल्हा भरातील कार्यकर्ते उपस्थित होते.
VIDEO : जयदत्त क्षीरसागर काय म्हणाले?