राहुल गांधी यांचे निलंबन होणार का? अध्यक्ष आणि अमित शहा यांच्या भेटीत काय ठरलं?

| Updated on: Jul 01, 2024 | 7:25 PM

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी हिंदू, अग्निवीर योजना आणि NEET या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला. राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. याचवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सभापती ओम बिर्ला यांची स्वतंत्र भेट घेतली.

राहुल गांधी यांचे निलंबन होणार का? अध्यक्ष आणि अमित शहा यांच्या भेटीत काय ठरलं?
AMIT SHAH, OM BIRLA AND RAHUL GANDHI
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. राहुल गांधी लोकसभेत बोलत असताना सत्ताधारी पक्षाकडून अनेक वेळा गोंधळ घालण्यात आला. सभापती ओम बिर्ला यांनीही राहुल गांधी यांना सभागृहाची मर्यादा पाळण्यास सांगितले. परंतु, राहुल गांधी यांनी अग्निवीर योजना, हिंदुत्व आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारवर आरोप केले. त्यांच्या या आरोपांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तीव्र आक्षेप घेतला. विरोधी पक्षनेत्यानी सांगितलेल्या अनेक गोष्टीमध्ये तथ्य नाही. त्या सत्य नाहीत. त्यामुळे या गोष्टींची पडताळणी करण्याची विनंती त्यांनी लोकसभा अध्यक्षांना केली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी यावर पडताळणी केली जाईल असे सांगितले. मात्र, यानंतर अमित शहा यांनी अध्यक्ष ओम बिर्ला यांची स्वतंत्र भेट घेतली.

लोकसभेत राहुल गांधी यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार हल्ला केला. राहुल गांधी यांनी भाजपवर देशात हिंसाचार, द्वेष आणि भीती पसरवल्याचा आरोप केला. हे लोक हिंदू नाहीत. कारण ते 24 तास हिंसाचार करतात. हिंदू कधीही हिंसा करू शकत नाही. द्वेष आणि भीती कधीही पसरवू शकत नाही.

राहुल गांधी यांच्या भाजपवरील या आरोपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी आक्षेप घेतला. काँग्रेस नेत्यांनी संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हटले आहे. संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे योग्य नाही, असे पंतप्रधान म्हणाले. तर, गृहमंत्री अमित शाह यांनी जे स्वत:ला हिंदू म्हणवतात ते हिंसा करतात. त्यांना माहित नाही की करोडो लोक अभिमानाने स्वतःला हिंदू म्हणवतात. ते सगळे हिंसाचार करतात का? राहुल गांधी यांनी मागितली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सभागृहामध्ये भगवान शंकराचे चित्र दाखवून सत्य, धैर्य आणि अहिंसा ही भगवान शंकराची प्रेरणा असल्याचे सांगितले. यामुळे सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. सभापती ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांना सभागृहात आपले म्हणणे मांडताना काळजी घ्यावी. सभागृहात छायाचित्रे दाखवता येणार नाहीत, असा नियम सांगितला.

‘अग्निपथ’ योजनेवर बोलताना राहुल गांधी यांनी ‘सैनिकांमध्ये भेदभाव निर्माण झाला आहे. ‘अग्नीवीर’मध्ये मृत्यू झाल्यास सैनिकाला शहीदाचा दर्जा मिळत नाही. त्यांच्या कुटुंबीयांना सामान्यांप्रमाणे पेन्शन आणि मदत मिळत नाही. अग्निवीर म्हणजे ‘वापरा आणि फेकून द्या असा मजूर’ आहे अशी टीका केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राहुल यांच्या आरोपांवर आक्षेप घेतला. विरोधी पक्षनेते सभागृहात चुकीची माहिती देत आहेत. प्राण गमावलेल्या अग्निवीरच्या कुटुंबाला मदत म्हणून एक कोटी रुपयांची तरतूद आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

राहुल गांधी यांच्या या विविध आरोपांनी घायाळ झालेल्या भाजपने गदारोळ करून त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. अखेर, सदनाचे कामकाज संपताच गृहमंत्री अमित शाह यांनी अध्यक्ष ओम बिर्ला यांची त्यांच्या सदनात भेट घेतली. या बैठकीत अमित शाह यांनी राहुल गांधींच्या लोकसभेतील भाषणावर चर्चा केली. विरोधी पक्षनेते सातत्याने खोटे बोलत आहेत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शाह यांनी केली. राहुल गांधी यांचे आरोप खोटे आढळल्यास सभागृहाची दिशाभूल केल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई अध्यक्ष ओम बिर्ला करू शकता अशी माहिती समोर येत आहे.