नवी दिल्ली | 3 डिसेंबर 2023 : पाच पैकी चार राज्यातील निवडणूकांचे निकाल जाहीर होत आहेत. हिंदी पट्टयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू कायम राहील्याचे स्पष्ट झाले आहे. छत्तीसगड विधानसभा निवडणूकांमध्ये भारतीय जनता पार्टी ( भाजपा ) मोठ्या विजयाकडे चालली आहे. ताज्या आकडेवारीनूसार 54 जागांवर भाजपापुढे चालली आहे. बहुमतासाठीच्या 46 या मॅजिक फिगरपेक्षा हा आकडा मोठा आहे. कॉंग्रेस 35 जागांवर पुढे आहे. भाजपाचे सरकार येणार अशी स्पष्ट चिन्हे असून आता छत्तीसगडच्या पुढचा मुख्यमंत्री कोण ? याची चर्चा सुरु आहे.
छत्तीसगडमध्ये 2003 पासून 2018 पर्यंत 15 वर्षे सरकारचे नेतृत्व करणाऱ्या डॉ. रमन सिंह यांना भाजपा मुख्यमंत्री बनविणार की नवा चेहरा देणार यावर चर्चा सुरु आहे. भाजपाने यंदा विधानसभा निवडणूकी पूर्वी मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषीत करण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावरच निवडणूक लढविली आहे. आता त्यामुळे भाजपाला मोठे यश मिळाले आहे. मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर रमन सिंह यांचा दावा फेटाळता येणार नसला तरी इतका मजबूतही नसल्याचे म्हटले आहे. जर अनुभवी रमन सिंह यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ टाकली नाही तर अन्य कोणाला संधी मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मुख्यमंत्री म्हणून अरुण साव, सरोज पांडे पासून लता उसेंडी पर्यंत अनेक नावे चर्चेत आहेत. कोण-कोण आहेत स्पर्धेत पाहूयात…
अरुण साव हे भाजपाचे छत्तीसगडचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली या निवडणूका लढल्या गेल्या. साल 2003 मध्ये पहिल्यांदा भाजपाला सत्ता मिळाली तेव्हा सीएम पदाचा चेहरा निश्चित नव्हता. तेव्हाही चेहरा घोषीत न करताच निवडणूका झाल्या. निवडणूका जिंकल्यानंतर भाजपाने प्रदेश अध्यक्ष डॉ. रमन सिंह यांना मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपविली होती, यंदाही तिच परिस्थिती आहे. अरुण साव यांचा मुख्ममंत्री पदासाठी मजबूत दावा आहे. अरुण साव ओबीसी वर्गातील साहू समाजातील आहेत. या समाजाचे राजकीय प्राबल्य आहे. या समाजाची लोकसंख्या 12 टक्के आहे. 2019 च्या लोकसभा निवडणूकापूर्वी पीएम मोदी यांनी एका रॅलीत येथील साहू समाजाला गुजरातीत मोदी म्हटले जाते असे म्हटले होते.
विजय बघेल दुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार आहेत. त्यांना भाजपाने पाटन जागेवर सीएम भूपेश बघेल यांच्या विरोधात उतरवले होते. विजय हे भूपेश यांचे पुतणे लागतात. मुख्यमंत्र्यांविरोधात लढणाऱ्या विजय बघेल यांचे नाव सीएमच्या शर्यतीत आहे. परंतू त्यांनी भूपेश बघेल यांचा पाडाव करायला हवा.
छत्तीसगडच्या सीएम पदाच्या शर्यतीत सरोज पांडेय याचे देखील नाव आहे. सरोज पांडेय भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि राज्यसभेच्या खासदार आहेत. सरोज भाजपाचा छत्तीसगडमधील मोठ्या नेत्या आहेत. त्या दोन वेळा भिलाई येथील महापौर आणि आमदार राहील्या आहेत सरोज 2009 मध्ये लोकसभेत निवडून आल्या आहेत. 2014 रोजी मोदीच्या लाटेतही त्या निवडणूक हरल्या होत्या. त्या भाजपाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष देखील राहील्या आहेत.
बृजमोहन अग्रवाल रायपूर दक्षिण विधानसभेच्या जागेवरून सात वेळा आमदार झाले आहेत, आता ते आठव्यांदा उभे आहेत. बृजमोहन अग्रवाल डॉक्टर रमन सिंह यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकारत मंत्री देखील होते. स्वच्छ प्रतिमा असलेले बृजमोहन सरळ स्वभावाचे नेते म्हटले जातात.
रेणूका सिंह आदिवासी समाजातील नेतृत्व आहे. केंद्र सरकारात राज्यमंत्री राहिलेल्या रेणूका सिंह 2003 रोजी पहिल्यांदा आमदार झाल्या होत्या. यंदा रेणूका यांना भरतपूरच्या सोनहत मधून मैदानात उतरविले होते. त्यांचे नाव मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत आहे.
लता उसेंडी छत्तीसगड मधील भाजपाचा आदिवासीमधील चेहरा मानला जाताो. साल 2003 रोजी कोंडागाव येथून प्रथम आमदार झाल्या. 31 व्या वर्षी त्या छत्तीसगड सरकारमध्ये मंत्री झाल्या. दोन वेळा आमदार झाल्या आणि दोन वेळा पराजय देखील झाला. आता त्या भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. लता भाजयुमोच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष देखील होत्या. छत्तीसगडमध्ये आदिवासी मुख्ममंत्री म्हणून त्यांना देखील संधी दिली जाऊ शकते असे म्हटले जाते. राज्य स्थापनेनंतर अजित जोगी यांच्या नंतर कोणीही आदिवासी मुख्यमंत्री झालेला नाही.