लोकसभा निवडणुकीमध्ये फक्त एका जागेवर अजितदादा यांच्या राष्ट्रवादी पक्षला vijay मिळविता आला. पक्षांचे अध्यक्ष असलेले अजित पवार यांना स्वतःच्या पत्नीलाही विजयी करता आले नाही. त्यातच भर म्हणून त्यांनी राज्यसभेच्या जागेवर पराभूत सुनेत्रा पवार यांची वर्णी लावली. अजित पवार यांच्या या निर्णयामुळे राज्यसभेत जाण्यासाठी इच्छुक असलेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ प्रचंड नाराज झाले. मोदी यांच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीला राज्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली. मात्र, प्रफुल्ल पटेल यांनी नकार दिला. त्यामुळे मोदी सरकारमध्ये राष्ट्रवादीला स्थान नाही. एकीकडे महायुतीतील सहकारी पक्ष अजित पवार यांच्यापासून अंतर राखत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तर, दुसरीकडे राष्ट्रवादीतील आमदारांना त्यांच्या भवितव्याची चिंता सतावत आहे. त्यामुळे अजित पवारांसोबत काही मोठे घडणार का? प्रश्न निर्माण झाला आहे.
पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राज्यसभेवर न पाठवल्याबद्दल आपल्या मनातली खदखद व्यक्त केली आहे. ,मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळ यांच्यावर जहरी टीका केली होती. त्याला ओबीसी मेळावा घेऊन भुजबळ यांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीतही भुजबळ यांनी हा मुद्दा उकरून काढला. मात्र, त्यावेळी राष्ट्रवादीच्या अन्य मंत्र्यानी मौन बाळगले. त्यामुळे भुजबळ पक्षावर नाराज होते. त्यातच राज्यसभेवर न पाठवल्याबद्दल भुजबळ यांच्या नाराजीत आणखी वाढ झाली.
लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांनी नेते, आमदार यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला पाच आमदार गैरहजर होते. यामध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचाही समावेश होता. नरहरी झिरवाळ यांनी होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवे उतरले आहेत. संदीप गुळवे यांनी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची भेट घेतली. यावेळी झिरवाळ यांनी कार्यकर्त्यांना संदीप गुळवे यांचे काम करण्याच्या सूचना दिल्या. नरहरी झिरवाळ यांची ही भूमिका अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
छगन भुगबळ यांच्या नाराजीच्या अटकेदरम्यानच झिरवाळ यांनी ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने अजितदादा गटात सर्व काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत. अजितदादा यांच्यासोबत सध्या 40 आमदार आहेत. लोकसभा निवडणुकी दरम्यान आमदार नीलेश लंके यांनी पुन्हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. अहमदनगर लोकसभेतून विजयी होऊन निलेश लंके आता खासदार झाले आहेत. त्यातच शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी 20 आमदारांना पुन्हा परतायचे आहे. ते शरद पवार यांच्या संपर्कात आहेत. पावसाळी अधिवेशनात हे आमदार पक्षात परत येऊ शकतात, असा दावा केला आहे.
छगन भुजबळ यांची नाराजी, झिरवाळ यांची भूमिका आणि आमदार रोहित पवार यांचे विधान ही सर्व परीस्थिती अजित पवार यांच्यासाठी अडचणीची ठरणारी आहे. त्यातच सहकारी पक्षातही अजितदादा यांच्यापासून काही अंतर राखीव ठेवत आहेत. अजितदादा गटाचे नेते सर्व काही आलबेल असल्याचा दावा करत असले तरी महाआघाडीत काही तरी बिनसले आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.