मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाने जोरदार तयारी सुरु केली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले. मात्र, त्यातील १३ खासदार शिंदे गटासोबत गेल्यामुळे उद्धव ठाकरे गट आता नव्या चेहऱ्यांच्या शोधात आहे. अशातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यासमोर उद्धव ठाकरे गटाच्या फायरब्रॅन्ड नेत्या सुषमा अंधारे लोकसभा निवडणूक लढविणार आहेत असाही माहिती सूत्रांनी दिली आहे. सुषमा अंधारे या परळीमधून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना आव्हान देणार अशी चर्चा सुरु होती. मात्र, त्यावेळी सुषमा अंधारे यांनी ‘मी परळीतच नाही तर बीड जिल्ह्यात कुठेही निवडणूक लढवणार नाही. पण, इलाका तुम्हारा, धमाका हमारा असे सांगत अप्रत्यक्षपणे इशारा दिला होता. हा इशारा नवनीत राणा यांना होता का अशी चर्चा आता सुरु झाली आहे.
शिवसेनेत बंडाळी सुरु असताना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सुषमा अंधारे नावाच्या वादळाला शिवसेनेत प्रवेश दिला. अंधारे यांना उपनेतेपद देऊन त्यांचा मान राखण्यात आला. पक्ष प्रवेशानंतर पहिल्याच दसरा मेळाव्यात सुषमा अंधारे यांनी नारायण राणे, देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर सडकून टीका केली. त्यांनतर शिवसंवाद यात्रा आणि त्यापाठोपाठ महाप्रबोधन यात्रा यांच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्र ढवळून काढला. या यात्रेदरम्यानही त्यांनी शिंदे गटाचे मंत्री, आमदार, नेते, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस आदी नेत्यांवर टीका करत विरोधकांना घाम फोडला.
दुसरीकडे, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी महाविकास आघाडी सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा देत जणू शिवसेनेलाच आव्हान दिले होते. त्यामुळे राज्यात राणा दाम्पत्य विरुद्ध शिवसेना असा संघर्ष निर्माण झाला होता.
अमरावती लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांनी शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता. नवनीत राणा यांनी ५१०९४७ मते तर अडसूळ यांना ४७३९९६ इतकी मते मिळाली होती.
मात्र, आनंद अडसूळ यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे या मतदारसंघात नवनीत राणा, अडसूळ यांच्यासमोर सशक्त पर्याय म्हणून सुषमा अंधारे यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.
विद्यमान खासदार नवनीत राणा राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आल्या असल्या तरी त्यांनी आता भाजपला साथ दिली आहे. तर, माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. आगामी निवडणूक काढविण्यासाठी नवनीत राणा आणि आनंद अडसूळ दोघेही इच्छुक आहेत. त्यामुळे या मतदारसंघात पक्षाला समर्थन देणाऱ्या नवनीत राणा की शिंदे गटाचे अडसूळ यांना भाजप पाठिंबा देणार याची उत्सुकता आहे.