नवी दिल्ली : मंत्रिमंडळ विस्ताराच्या (Cabinet Expansion) नमनालाच घडाभर तेल ओतल्या गेले. राज्याच्या राजकारणात काय सुरु आहे, हेच जनतेला कळेनासे झाले आहे. त्यात आता प्रत्यक्ष सत्तेत असलेले पण या राजकीय उलथापालथीमुळे पुरते गांगारुन गेले आहे. गेल्या वर्षभरापासून मंत्रिमंडळ विस्ताराच्या बाता सुरु होत्या. आता कुठे तरी या घडामोडी घडतील आणि मंत्रिमंडळ विस्तारात आपला क्रमांक लागेल, असे काहींना वाटत होते. पण 2 जुलैच्या राजकीय भुंकपाने अनेकांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) 9 आमदार आले आणि अवघ्या काही तासातच मंत्री झाले. पण गेल्या वर्षभरापासून देव पाण्यात ठेवणारे आजही प्रतिक्षेतच आहेत.
आमदार अस्वस्थ?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. चर्चा झाली. त्यानंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागल्याची चर्चा सुरु झाली. शिंदे गटातील अनेक इच्छुकांच्या आणि भाजपमधील काहींच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या. पण आज झालेल्या राजकीय उलथापालथीने सर्व समीकरणच बिघडवले. त्यामुळे शिंदे गटातील आणि भाजपमधील काही आमदार अस्वस्थ झाल्याची चर्चा आहे.
एकदाच विस्तार
30 जून 2022 रोजी शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आले होते. त्यानंतर पुढील दीड महिने या दोघांनीच राज्याचा गाडा हाकलला. 45 दिवस मंत्रिमंडळाविना सरकार चालविण्याचा रेकॉर्ड या सरकारने केला. त्यानंतर 9 ऑगस्ट 2022 रोजी पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. खाते वाटप 14 ऑगस्ट 2022 रोजी झाले. तेव्हापासून अनेकांचे देव पाण्यातच आहेत.
मंत्रिपदाची लॉटरी
अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीची मोठी फलटण शिंदे-भाजप सरकारसोबत उभी राहिली आहे. त्यातील काहींना लागलीच मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद तर छगन भुजबळ यांना कॅबिनेट मंत्री पद मिळाले. दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे,धर्मराव बाबा अत्राम,आदिती तटकरे संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांना आल्या आल्या मंत्रिपदाची लॉटरी लागली
हिरमोड झाला
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात संधी मिळेल म्हणून अनेक जण गुडघ्याला बाशिंग लावून बसले होते. छोटेखानी विस्तारात आपल्याला प्रवेश मिळेल असे भाजप आणि शिंदे गटातील इच्छुकांना वाटत होते. पण हा आनंद औट घटकेचाच ठरला. त्यांचा आजच्या राजकीय भूंकपाने प्रचंड हिरमोड झाला. याच साठी केला होता का हा अट्टहास अशी म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यांची अवस्था ना घर का ना घाटका अशी झाली आहे. कुरघोडीच्या या राजकारणात त्यांचा आता कितपत निभाव लागणार?