अमरावती : जिल्ह्याच्या प्रशासनाला कामाला लावण्याचे काम पालकमंत्री करत असतात. पालकमंत्र्यांचा जिल्हा प्रशासनावर वचक असतो. त्यामुळं जनतेची कामं जोमानं होतात. असा अनुभव आहे. बच्चू कडू याचा परिचय देत असतात. नागरिकांची कामं झाली नाहीत. तर थेट कर्मचाऱ्यांना झापतात. प्रसंगी अधिकाऱ्यांनाही धारेवर धरतात. पालकमंत्री जिल्ह्यात असले म्हणजे प्रशासन सुरळीत चालते. पण, गेल्यात तीन दिवसांपासून पश्चिम विदर्भातील तीन पालकमंत्री हे जिल्ह्याच्या बाहेर आहेत. अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू आहेत. वाशिमचे पालकमंत्री संभुराज देसाई(Sambhuraj Desai) आहेत. तर यवतमाळचे पालकमंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre)आहेत. पण, या तिन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारले. राष्ट्रवादीसोबत सरकार चालवता येणार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं हे तिन्ही नेते राज्याच्या बाहेर आहेत.
राज्यातील शिवसेनेचे 40 आमदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यामध्ये बच्चू कडू, संभुराज देसाई आणि संदिपान भुमरे हेही आहेत. हे तिन्ही मंत्री आहेत. त्यामुळं त्यांच्याकडं पालकमंत्री म्हणून जबाबदारी दिलेली आहे. पण, ही जबाबदारी गेल्या तीन दिवसांपासून पाळताना दिसत नाही. कारण तीन दिवसांपूर्वी हे आमदार, मंत्री सुरतला गेले. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी त्यांनी त्यांचा मुक्काम गुवाहाटी येथे हलविला. त्यामुळं या पालकमंत्र्यांचं जिल्ह्याच्या विकासकामांकडं लक्ष नाही.
शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू हे जिल्ह्यात अॅक्टिव्ह असतात. जिल्ह्यात दौरे करत असतात. पण, आता ते गुवाहाटी दौऱ्यावर असल्यानं जिल्ह्यात नाहीत. वाशिमच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी शंभूराज देसाई यांच्याकडं आहे. देसाई हे सातारा जिल्ह्यातले आहेत. त्यांचे मोजकेच दौरे वाशिम जिल्ह्यात होतात. तेसुद्धा संपर्काच्या बाहेर आहेत. तसेही देसाई हे राष्ट्रीय सण, ध्वजारोहणाला येत असतात. यवतमाळात तीच परिस्थिती आहे. संजय राठोडांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचे मंत्रीपद गेले. पालकमंत्रीपद संदिपान भुमरे यांच्याकडं आलं. तेही एकनाथ शिंदेंसोबत गेलेत. त्यामुळं तिन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्ह्याबाहेर असल्यानं जिल्ह्यातील विकासकामांना चाप बसला आहे.