बुलडाणा : आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) हे एकनाथ शिंदेंसोबत सूरतला (Surat) गेले होते. तिथून ते परत आले. माझ्यावर इंजेक्शनचा प्रयोग केल्याचा आरोप त्यांनी केला. शिवाय पोलिसांचा किती गराडा होता, हेही सांगितलं. ते शिंदे यांच्या कंपुतून परत ठाकरे यांच्या कंपुत आले. असाच एक प्रसंग 2019 मध्ये सत्तानाट्याच्या वेळी घडला होता. त्यावेळी डॉ. राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingane) हे अजित पवार यांच्यासोबत शपथविधीला उपस्थित होते. पण, नंतर ते शरद पवारांकडं गेले. अजित पवारांच्या कंपुतून बाहेर आले होते. त्यामुळं त्यावेळी शिंगणे यावेळी देशमुख हे एक कंपुतून दुसऱ्या कंपूत आले. योगायोग म्हणजे हे दोन्ही नेते हे पश्चिम वऱ्हाडातील आहेत. दोन बंडांचे दोन आमदार साक्षीदार आहेत.
विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेमधील नाराज असलेल्या कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याच शिवसेना पक्षाविरुद्ध बंड पुकारला. शिवसेनेचे काही आमदार सुरतमार्गे गुवाहाटीला नेले. शिवसेनेच्या काही मंत्र्यांसह 40 पेक्षा जास्त आमदार असल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. यामध्ये बुलडाण्याच्या शिवसेनेच्या दोन्ही आमदारांचा समावेश आहे. या बंडखोरीमुळे राज्यात राजकीय वादळ आलंय. मात्र तीन वर्षात दुसऱ्यांदा झालेल्या बंडाचे साक्षीदार हे पश्चिम वऱ्हाडतील नेते ठरले आहेत. अर्थात योगायोगाने याचा बुलडाणा आणि अकोला जिल्हा साक्षीदार झालाय. अकोला जिल्ह्यातील बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख परत आलेत. त्यांच्या प्रवासाचा थरारक अनुभव माध्यमांसमोर सांगितलाय. आमदार देशमुख यांच्या काही मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह देखील निर्माण करण्यात आलंय. तो भाग वेगळा.
असाच एक प्रकार 23 नोव्हेंबर 2020 रोजी घडला होता. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीला उपस्थित असलेल्या डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी माध्यमांसमोर आले. अजितदादांनी आम्हाला अंधारात ठेवले, असा दावा केला होता. त्यामुळे डॉक्टर शिंगणे यांनी लगेच बाहेर पडून शरद पवार यांचा बंगला गाठला. सर्व हकिकत सांगितली. त्यामुळे पश्चिम वऱ्हाडातील हे दोन्ही नेते बंडखोरीचे साक्षीदार बनले आहेत. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या गटात असलेल्या आमदारांमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील आमदार संजय गायकवाड आणि आमदार संजय रायमुलकर यांचाही समावेश आहे. मात्र ते परत आल्यानंतर यासंदर्भात काय अनुभव सांगतात, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. त्यांचे अनुभवही डॉक्टर शिंगणे किंवा आमदार नितीन देशमुख यांच्याप्रमाणे असतील का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे. एकंदरीतच योगायोगाने बंडाचा साक्षीदार होण्याचा योग हा बुलडाणा जिल्ह्याला आलाय. याची चर्चा तर होणारच.