वाराणसी (उत्तर प्रदेश) : पंतप्रधान आणि वाराणसी लोकसभेचे भाजप उमेदवार नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत रोड शो होत आहे. या रोड शोला भाजपचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी भाजपने ग्रॅण्ड नियोजन केलं आहे. ‘टीव्ही 9 मराठी डॉट कॉम’वर मोदींच्या या रोड शोचा खास ग्राऊंड रिपोर्ट तुम्हाला पाहता, वाचता येणार आहे. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि सी व्होटर या निवडणूक सर्वेक्षण संस्थेचे संस्थापक यशवंत देशमुख यांनी वाराणसीतून मोदींच्या रोड शोचं विश्लेषण tv9marathi.com साठी केलं आहे.
मोदींचा रोड शो आज होत असला, तरी टीव्ही 9 टीमने कालपासूनच वाराणसी परिसरातील जनतेची मतं जाणून घेतली.
यशवंत देशमुख यांचं विश्लेषण
प्रियांका गांधी यांना काँग्रेसने वाराणसीतून नरेंद्र मोदींविरोधात उतरवलं, तर या मतदारसंघात कडवी लढत होईल, पण प्रियांका गांधी यांचा विजय होईल याबाबत मला शंका आहे.
माझा जन्म वाराणसीचा आहे. बीएचयू हॉस्पिटलमध्ये माझा जन्म झाला. काशी हिंदू विश्वविद्यालयात माझं बालपण, तरुणपण गेलं. या शहराची (वाराणसी) अध्यात्मिक वैशिष्ट्य आणि राजकीय वैशिष्ट्य वेगळं आहे. एकेकाळी या मतदारसंघावर कम्युनिस्ट पक्षाचंही वैशिष्ट्य होतं, जनसंघानेही वर्चस्व मिळवलं. शिवाय काँग्रेसनेही आता आता म्हणजे 2004 मध्ये या मतदारसंघात विजय मिळवला होता. त्यामुळे या मतदारसंघात एकाच पक्षाचं वर्चस्व आहे असं म्हणता येणार नाही.
या शहराने मोठं नाव कधीही कमी होऊ दिलं नाही, किंवा त्या नावाची प्रतिष्ठा राखली. ज्या ज्या बड्या नेत्यांनी इथून निवडणूक लढवली, त्या त्या नेत्यांना या मतदारसंघाने प्रतिष्ठा दिली. मुरली मनोहर जोशी हे एकेकाळी संकटात वाटत होते, मात्र त्यांचाही विजय झाला.
वाराणसीला पंतप्रधानांकडून काय मिळालं?
मी अनेकवेळा लिहिलं आहे, त्यामुळे अनेकांनी माझ्यावर टीका केली. माझं म्हणणं आहे की मोदी हे देशासाठी पंतप्रधान असतील, पण ते आमच्यासाठी इथले खासदार आहेत. आज ते पंतप्रधान म्हणून नव्हे तर केवळ खासदार म्हणून वाराणसीत मत मागण्यास येत आहेत. त्यामुळे या शहरात मोदींचं विश्लेषण पंतप्रधान म्हणून नव्हे तर खासदार म्हणूनही करायला हवं.
वाराणसीतील फरक
ज्यांनी पाच वर्षांपूर्वीची वाराणसी पाहिली नाही, त्यांना बदलेल्या सध्याच्या वाराणसीतील फरक समजणार नाही. आम्ही बीएचयूवरुन गिरोलीया रस्त्याकडे निघालो. या रस्त्यावर आधी डोक्यापासून उजवीकडे-डावीकडे सर्वत्र वायर-केबलचं जंजाळ पाहायला मिळत होतं. गाडीवरुन जाताना कधीतरी या केबल डोक्यावरुन गळ्यात अडकू शकत होत्या. सध्या अर्ध्यापेक्षा जास्त या वायर्स अंडरग्राऊंड अर्थात जमिनीखालून घेण्याचं काम झालं आहे. हे मोठं काम आहे.
नियोजित विकासाचा अभाव
वाराणसी हे शहर प्राचीन आहे. इथे विकास होत आला असला तरी नियोजित विकास झालेला नाही. वाराणसी शहर हे चढावर आहे. शहरात एक जुना नाला आहे. शहर चढावर असल्याने नाले जाऊन थेट गंगेला मिळतात. परिणामी प्रदूषण वाढतं. या शहराला मोदींकडून एक खासदार म्हणून अपेक्षा होती ती म्हणून सीवेज सिस्टम प्लांट अर्थात सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्याची गरज होती. गंगेचं प्रदूषण रोखण्याची मोठी गरज होती.
गोवंश, गाय
वाराणसीच्या रस्त्यावरच्या गायी, गोवंश जिथल्या तिथेच दिसतील. रस्त्यावरुन चालताना तुम्हाला मार्ग काढावा लागेल, त्या गायी हटणार नाहीत. वाराणसीत अनेक छोटे छोटे रस्ते आहेत. एका वेळी एकच वाहन जाऊ शकतं. जर समोरुन गाय आली, तर समोरुन येणाऱ्या व्यक्तीला शेजारच्या घरात जावं लागतं, गाय पुढे गेल्यावर मग मार्गस्थ व्हावं लागतं. हे वाराणसीचं खरं रुप आहे.
वाराणसीची ओळख
प्रत्येक मतदारसंघाला एखाद्याची ओळख आहे. जसं अमेठी राहुल गांधी, रायबरेली सोनिया गांधी, तसं वाराणसीला कोणाच्या ओळखीच्या शिक्क्याची गरज नाही. वाराणसी जो मोदींचा मतदारसंघ आहे असं नव्हे तर ते मोदी जे वाराणसीतून येतात, अशी ओळख आहे. वाराणसीची स्वत:ची ओळख आहे, मोदीजी त्यामध्ये भर टाकत आहेत. केवळ मोदींमुळे वाराणसी नाही.
वाराणसीत सर्व
वाराणसी हे सर्वांचं शहर आहे. इथे गुजराती, बंगाली, तामीळ, मराठी असे सर्व आहेत. मात्र इथली ओळख केवळ वाराणसीची आहे, कोणत्याही प्रातांची ओळख नाही. माझं आडनाव देशमुख आहे, लोक गोंधळून जातात मी मराठी आहे. अनेक वर्षांपूर्वी माझं कुटुंब इकडे आलं. मराठी माझी मातृभाषा नाही तर भोजपुरी आहे. या शहरात प्रत्येक राज्याचे लोक आहेत, सर्वांची मातृभाषा भोजपुरी आहे.