वाशिम : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात चार वेळा प्रतिनिधित्व केलेल्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना पक्षाने पुन्हा एकदा तिकीट दिलंय. वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्यामधील वाद हा तात्पुरता असून तो माझा भाऊ आहे, भावाची पाठीवर थाप आणि शिवसैनिकांवरच्या विश्वासामुळे मी यंदा पाचव्यांदा लोकसभा निवडणूक जिंकणार असल्याचं मत खासदार भावना गवळी यांनी बोलताना सांगितलं.
यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांना पुन्हा उमेदवारी मिळू नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तीन ‘भाऊंनी’ घेतलेली भेट जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला होती. मात्र युतीच्या अमरावती येथे झालेल्या पहिल्या मेळाव्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारीमुळे नाराज नेते पालकमंत्री संजय राठोड यांनाच बहिणीला निवडून आणण्याची जबाबदारी दिली असल्याचं खासदारांनी सांगितलं.
खासदार भावना गवळी यांना तिकीट मिळू नये यासाठी शिवसेनेचे आमदार आणि राज्यमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गळही घातली होती. त्यांना भाजपच्या आमदारांचाही पाठिंबा मिळाला होता. भाजप आमदार आणि राज्यमंत्री मदन येरावार, आमदार राजेंद्र पाटणी आणि संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे भावना गवळी नको अशी मागणी केली असल्याची चर्चा होती.
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप युती विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांच्यात लढतीचे चित्र आहे. असे असले तरी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी काहींचे समीकरण बदलणार यात शंका नाही. अनेक वर्षे यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र मागील दोन निवडणुकांपासून शिवसेनेने काँग्रेसच्या बालेकिल्लाला खिंडार पाडत शिवसेनेचा गड केला आहे. आगामी निवडणुकीतही काँग्रेस-शिवसेना असाच सामना रंगणार की तिरंगी लढत होणार हे येणार काळ ठरवेल.
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी यांनी सर्व अंदाज मोडित काढीत 93 हजार 816 मताधिक्क्याने विजय संपादित केला. त्यांना चार लाख 77 हजार 905 मते मिळाली. काँग्रेसचे शिवाजीराव मोघे यांचा पराभव करत त्या चौथ्यांदा लोकसभेत पोहोचल्या होत्या.
मतदारसंघात बहुतांश शेतकरी आहेत. कपाशी आणि सोयाबीन हे प्रमुख पीक आहे. यंदा कपाशीचे बोंडअळीने नुकसान झाले, तर सोयाबीनला भाव मिळत नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यावर शेतकरी नाराज आहेत.
जिल्ह्यात महाराष्ट्र औद्योगिक वसाहत आहे. मात्र पुरेशा सुविधा नसल्यामुळे प्रक्रिया उद्योग नाहीत. त्यामुळे प्रमुख समस्या रोजगाराची आहे. खरीप हंगाम संपला की जिल्ह्यातील गावच्या गाव खाली होऊन स्थलांतर होत आहे.
ग्रामीण भागात अजूनही भीषण पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.1999 पासून खासदार असलेल्या भावना गवळी यांनी एक महत्त्वाचं काम म्हणजे पूर्णा ते अकोला मिटरगेजचे रूपांतर सह ब्रॉडगेज करून उड्डाणपुलाचे काम सुरू आहे.
सत्तेची सवय जडलेल्या काँग्रेसच्या दोन्ही गटांना 2019 मध्ये पराभवाचे चटके सोसायचे नाही. तेव्हा संघर्ष नकोच या भूमिकेत 2019 मध्ये काँग्रेसचे दोन्ही गट राहतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे आणि भावना गवळी यांच्यासाठी वाशिम-यवतमाळ लोकसभा निवडणूक अस्तित्वाची लढाई असून पराभूत उमेदवार राजकीय संन्यासाचा मानकरी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. अजून निवडणुकीच्या रणधुमाळीला उसंत असल्याने आपली फळी मजबूत करण्यासाठी दोन्ही नेते मतदारसंघात जनसंपर्कामध्ये व्यस्त झाले आहेत.