मुंबई | 1 मार्च 2024 : लोकसभा निवडणूकीचे वारे सर्वत्र वाहू लागले असताना एकीकडे जागा वाटपाच्या यादीवरुन अंतिम हात फिरविला जात असतानाच दुसरीकडे महाराष्ट्रात पक्ष फोडाफोडीमुळे राजकारण तापले आहे. यातच यंदाच्या लोकसभा निवडणूका या चार प्रमुख पक्षांऐवजी सहा पक्षांमध्ये लढविल्या जाणार आहेत. त्यामुळे निवडणूकांमध्ये काटे की टक्कर होणार आहे. या पार्श्वभूमीवर टीव्ही 9 मराठीच्या महासंग्राम लोकसभेचा या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत टीव्ही 9 मराठीचे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांनी घेतली. या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी भाजपात प्रवेश केलेल्या मोठ्या नेत्यासंदर्भात आपली मते स्पष्ट मते मांडलीच तसेच आपल्या राजकारणात आपण कायम प्रो-ओबीसी राहील्याचेही सांगितले.
मराठ्यांना आरक्षण मी मुख्यमंत्री असताना दिले आणि ती हायकोर्टातही टीकले, तसेच मी मुख्यमंत्री असेपर्यंत सर्वोच्च न्यायालयातही ते टीकविल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. आघाडी सरकारला ते टीकविता आले नाही. आता आमच्या सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठ्यांना 10 टक्के आरक्षण दिले असल्याचे त्यांनी सांगितले. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली होती. यावर बोलताना ते म्हणाले की मराठ्यांना ओबीसीत टाकले असते तर मनभेद झाले असते. आरक्षण वाढले नसते. जेवढे ओबीसी आरक्षणात आहेत, तेवढेच मराठा ओबीसी आरक्षणात आले असते. कुणाच्याच वाट्याला काही आलं नसतं असे त्यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की जे मायक्रो ओबीसी आहेत, ओबीसीतील मोठे घटक आणि मराठा समाज यांना फायदा झाला असता. पण छोट्या ओबीसी घटकांना त्यात ओबीसीतील 300 छोट्या जाती आहेत. त्यांना न्याय मिळाला नसता, सामाजिक न्याय देण्याऐवजी सामाजिक अन्याय झाला असता. हा कॉन्शस निर्णय होता. ओबीसींनाही न्याय दिला पाहिजे आणि मराठा समाजालाही न्याय दिला पाहिजे, असा न्याय तत्त्वावर हा निर्णय घेतल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
भुजबळ तुमचा माणूस आहे का ? असा सवाल केला जात आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की भुजबळ कुणाचा माणूस म्हणता येईल का? मी राजकारणात येण्याच्या आधीपासून ते राजकारणात आहेत. मी 1989 ला आलो. ते 85 मध्ये महापौर होते. काही बाबतीत भुजबळांचा इतिहास पाहिला तर भुजबळांचं शिवसेनेसोबत भांडण का झालं ? शिवसेनेला मंडल आयोग मान्य नव्हतं. मंडल आयोगासाठी त्यांनी शिवसेना सोडली. ते काँग्रेससोबत गेले होते असे फडणवीस यांनी सांगितले.
माझ्या राजकारणाच्या पहिल्या दिवसापासून मी ओबीसींच्या बाजूने आहे. माझं ठाम मत आहे की सामाजिक न्याय करायचा असेल तर जसं शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांना न्याय दिल्याशिवाय ‘सामाजिक न्याय’ होऊ शकत नाही. तसंच ओबीसींना न्याय दिल्याशिवाय ‘सामाजिक न्याय’ होऊ शकत नाही. आजही तुम्ही बघा ओबीसीतील बारा बलुतेदारांची अवस्था पाहा. त्यातील छोट्या जातींची अवस्था पाहा. त्यांची अवस्था आणि अनुसूचित जातीतील लोकात फार थोडा फरक आहे. त्यामुळे मी पहिल्या दिवसापासून… महाराष्ट्रात नॉन क्रिमिलियरसाठी संघर्ष केला. क्रिमिलियरची मर्यादा 8 लाखावरून अडीच लाख केली. मी संघर्ष करून ती वाढवून घेतली. भुजबळ आणि माझ्यात हीच समानता आहे, ते म्हणजे मी प्रो -ओबीसी राहिलो. ओबीसींच्या बाजूने राहिलो म्हणजे परंतू मी अँटी मराठा नव्हतो असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मराठ्यांसाठी मी जेवढे निर्णय घेतले तेवढे कुणी घेतले दाखवा. मराठा तरुणांसाठी सारथी संस्था, वसतीगृहाची व्यवस्था, वसतीगृह भत्ता, अण्णासाहेब पाटील महामंडळ अशा अनेक योजना जाहीर केल्या आणि आता एकनाथ शिंदे यांनी मराठ्यांसाठी योग्य निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.