मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर (Vinayak Savarkar) यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होतेय. भाजपकडून तर त्यांच्यावर वारंवार शाब्दिक हल्ला केला जातोय. अशातच भाजप आमदार योगेश सागर यांनी राहुल गांधीवर (Rahul Gandhi) ‘पप्पू’ म्हणत टीका केलीय.
राहुल गांधी यांना देशाचा इतिहास माहिती नाहीये. त्यांचा स्वातंत्र्य चळवळीचा अभ्यास कमी आहे. राहुल गांधी 100% पप्पू माणूस आहे. राहुल गांधी क्रांतीसूर्य सावरकरांचा अपमान करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना जास्त सिरीयसली घेण्याची गरज नाही. त्यांना देश माफ करणार नाही, असं योगेश सागर म्हणालेत.
भारत जोडो यात्रेदरम्यान संबोधित करताना राहुल गांधी यांनी विनायक सावरकर यांच्यावर टीका केली. सावरकर इंग्रजांकडून पेन्शन घ्यायचे. काँग्रेसच्या स्वातंत्र्य चळवळीच्या विरोधात जात ते इंग्रजांसोबत काम करायचे. सावरकर तुरुंगातून बाहेर आले तेव्हा खरे सावरकर सगळ्यांसमोर आले. सावरकरांनी इंग्रजांना पत्र लिहिली. त्यानंतर इंग्रजांनी त्यांना सोबत काम करण्याचं आमंत्रण दिलं. सावरकरांनी इंग्रजांसमोर हात जोडले आणि मी आपल्यासोबत काम करायला तयार आहे.तुमच्या अपेक्षेप्रमाणे मी काम करेन, असं म्हणत राहुल गांधी यांनी सावरकरांच्या स्वातंत्र्य लढ्यातील भूमिकेवर टीका केलीय.
देवेंद्र फडणवीस यांनीही राहुल गांधींच्या या विधानाचा निषेध केलाय. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणारा विचार जमीनीमध्ये गाडल्याशिवाय शांत बसणार नाही, असं फडणवीस म्हणालेत.स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणारा विचार जमीनीमध्ये गाडल्याशिवाय शांत बसणार नाही, असं फडणवीस म्हणालेत. याचसोबत भाजपच्या अन्य नेत्यांनीही सावरकरांच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांच्यावर टीका केलीय.