हिंगोलीः महाराष्ट्रातील वेदांता प्रकल्प गुजरातेत गेल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि भाजप (BJP) सरकारवर सर्व स्तरांतून टीका होतेय. १ लाख तरुणांना रोजगार देणारा प्रकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने गुजरातेत कसा जाऊ दिला, असा प्रश्न विचारला जातोय. तर उद्योगमंत्री उदय सामंतांवरही (Uday Samant) हल्लाबोल केला जातोय. युवासेना नेते वरुण देसाई यांनीही यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. राज्यभरातील सर्व तरुणांनी उद्योगमंत्र्यांचा राजीनामा मागितला पाहिजे, असं वक्तव्य वरुण देसाई यांनी केलं. देसाई आज हिंगोली दौऱ्यावर होते.
वेदांता प्रकल्पावरून उद्योगमंत्र्यांवर टीका करताना वरुण देसाई म्हणाले, ‘ उद्योगमंत्री स्वतः म्हणतात, मला याची कल्पनाच नाही. दीड लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट राज्यातून निघून जाते. 1 लाख नोकऱ्यांची संधी इथून निघून जाते आणि उद्योगमंत्री म्हणतात, मला याची कल्पना नाही. अशा उद्योगमंत्र्यांकडून तरुणांनी राजीनामा मागितला पाहिजे.
सरकारने बेरोजगारी हटवण्याऐवजी, केवळ पक्ष मजबूत कसा होईल, कुणाला किती खोके दिल्यावर ते आपल्याकडे येतील होतील, कोणतं सरकार पाडता येईल, याकडे सगळा फोकस आहे. त्यामुळे तरुण काय करत आहेत, याकडे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप वरुण देसाई यांनी केला.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनीही वेदांतावरून राज्य सरकारला धारेवर धरलं. ते म्हणाले, ‘ हा प्रकल्प राज्यात का आला नाही? यावर योग्य उत्तर अपेक्षित होतं. केंद्र सरकार आणि राज्य सरकारची मिळून थोडी सांगड घालायची गरज होती. जून महिन्यापर्यंत आम्ही फॉलोअप घेतला. महाराष्ट्रातल्या 1 लाख तरुणांना नोकऱ्या मिलणार नाही, याची जबाबदारी कोण घेतंय, हे स्पष्ट नाहीये. तळेगावमध्ये हा प्रकल्प येणार होता. तो गुजरातेत कसा गेला, याचं उत्तर मिळालेलं नाही.