मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी कोकण दौऱ्यावर शिवसेनेचे १६ चे १६० आमदार होतील असे वक्तव्य केले. त्यांच्या या विधानाचा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी समाचार घेतला. तुमच्या सोबत हे १६ आहेत त्याचे १० होऊ नये याची काळजी घ्यावी अशी टीका नारायण राणे यांनी केलीय. कोकणात येऊन काय घेता तर बैठका घेता. डिसेंबर नंतर ते बैठका घेण्यासाठीही येणार नाहीत. काही दिवसानंतर ते जेलमध्ये जाणार आहेत. त्यांच्यासोबत संजय राऊतही असतील असा इशाराही नारायण राणे यांनी दिला.
आदित्य ठाकरे यांनी कोकण दौरा केला. यावेळी त्यांनी बैठका घेतल्या. यावरुन टीका करताना राणे म्हणाले, आदित्य ठाकरे कोण आहेत? त्याला मी गांभीर्याने घेत नाही. कोकणात येऊन बैठक घेतो. ही शिवसेनेची अधोगती नाही का? शिवसेना अधोगतीकडे चालली आहे. सभा नाही घेत आता बैठक घेतोय. जाहीर सभेला मैदान लागते. पण, आता त्याचे खळग झाले, असे राणे म्हणाले.
कोकण दौऱ्यात आदित्य ठाकरे यांनी 16 आमदारांचे १६० आमदार निवडून आणू असा दावा केला. त्याची खिल्ली उडविताना ठाकरे परिवाराकडे नवीन आमदार निवडून आणण्याची क्षमता नाही. त्यामुळे कशाच्या आधारावर ते बोलतात हा एक मोठा प्रश्न आहे. त्याच्यासोबत जे 16 आहेत त्यापैकी निवडणुकीत पाच पण येणार नाहीत. ती काय जादूची कांडी आहे का? असा टोला राणे यांनी लगावला.
ठाकरे यांच्याकडे जे आमदार होते ते त्यांना सांभाळता आले नाही. जे होते ते दिवसाढवळ्या पळाले. 16 चे 160 होतील का असा कोणता साचा त्याच्याकडे आहे का? आदित्य ठाकरे हा आता बैठकीला नाही तर जेलमध्ये असेल. सुशांतसिंग केसमध्ये तो जेलमध्ये असेल. त्याच्यासोबत संजय राऊत ही असेल, असा इशाराही राणे यांनी यावेळी दिला.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा व्हिडिओ संजय राऊत यांनी ट्विट केला होता. त्यामुळे राज्यात खळबळ माजली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना राणे म्हणाले, संजय राऊत हा मानसिक रुग्ण आहे. तो डिप्रेशनमध्ये जात आहे. त्यामुळे अशा व्यक्तींवर न बोललेले बरे. संजय राऊत यांनी कधी जनहिताचे प्रश्न उपस्थित केले आहेत का? अशी टीकाही राणे यांनी यावेळी केली.
मराठा समाजाला मराठा म्हणून वेगळे 16 टक्के आरक्षण द्यावे. घटनेनुसार मागास असलेल्या समाजाला आरक्षण दिले जात असते. त्याचप्रमाणे मराठा समाजाला मराठा म्हणूनच आरक्षण दिले जावे. राज्यात सापडलेल्या 32 लाख कुणबी नोंदी संदर्भात सरकारने निर्णय घ्यावा. राज्य सरकार त्यासाठी सक्षम आहे असे सांगत नारायण राणे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका मांडली.