मुंबई : ‘स्वराज्य’चं (Swarajya) बोधचिन्ह जनतेच्या कल्पनेतून साकारणार असल्याचं संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांची स्पष्ट केलं आहे. पण त्याआधी संभाजीराजे यांनी जनतेला आवाहन केलं आहे. बोधचिन्ह सुचवण्याचं आवाहन त्यांनी जनतेला केलं आहे. “विस्थापित मावळ्यांना संघटित करून जनतेच्या मनातलं ‘स्वराज्य’ आणण्यासाठी ‘स्वराज्य’ संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. या संघटनेचे अधिकृत बोधचिन्ह म्हणजेच लोगो जनतेच्याच संकल्पनेतून साकारावं, अशी आमची इच्छा आहे. ते बोधचिन्ह सुचवा असं आवाहन संभाजीराजे यांनी केलं आहे.
‘स्वराज्य’ ही संघटना जनतेसाठी उभी करण्यात आली आहे. ‘स्वराज्य’ या संघटनेचे अधिकृत बोधचिन्ह जनतेच्याच संकल्पनेतून साकारावं, अशी संभाजीराजे यांची इच्छा आहे. हे बोधचिन्ह सर्वसामान्य जनतेचं प्रतिनिधित्व करणारं असावं. जनतेचं प्रतिनिधीत्व करणारं असावं, अशी इच्छा संभाजीराजेंनी व्यक्त केली आहे.
• बोधचिन्ह हे लक्षवेधी व संस्मरणीय असावे. ते फार क्लिष्ट असू नये.
• बोधचिन्ह हे रेडियम प्रिंट, ग्राफिक प्रिंट अशा कोणत्याही स्वरूपात वापरण्यास सोयीस्कर असावे.
• एकदा बोधचिन्ह स्वीकृत केल्यानंतर त्यावर पूर्ण अधिकार हा स्वराज्य संघटनेचा असेल.
• एखाद्या बोधचिन्हाची संकल्पना आवडल्यास ते स्वीकृत केल्यानंतर, त्यामध्ये कोणतेही बदल करण्याचे अधिकार स्वराज्य संघटनेकडे असतील.
तुमच्याकडे काही कल्पना असेल तर तुम्ही तयार केलेलं बोधचिन्ह ‘स्वराज्य’साठी वापरलं जाणार आहे. तुम्ही तयार केलेलं बोधचिन्ह तुम्ही व्हॉट्सॲप करू शकता त्यासाठी संभाजीराजे यांनी आपल्या पोस्टमध्ये एक नंबर दिला आहे. त्यावर तुम्ही तयार केलेलं बोधचिन्ह पाठवता येईल. हे बोधचिन्ह तुम्ही 20 जूनपर्यंत पाठवू शकता.
स्वराज्य संघटनेसाठी जी व्यक्ती बोधचिन्ह सुचववेल. त्याचा यथेच्छ सन्मान केला जाईल. ज्या व्यक्तीने तयार केलेलं बोधचिन्ह ‘स्वराज्य’चं अधिकृत बोधचिन्ह म्हणून स्वीकारलं जाईल, त्यांचा छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते मानपत्र व मानचिन्ह देऊन सन्मानित केलं जाणार आहे.
मराठा आंदोलनाचं नेतृत्व केल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांचं नेतृत्व सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचलं. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन त्यांनी वेळोवेळी कठोर पण सकारात्मक भूमिका मांडली. वेळप्रसंगी सरकारला खडे बोल सुनावले. बहुजनांसह सर्वसामान्य मराठा तरुणाला न्याय मिळावा यासाठी संभाजीराजे झटताना पाहायला मिळाले. त्यामुळेच त्यांना मानणारा एक स्वतंत्र वर्ग राज्यात तयार झाला. याच जनतेच्या प्रश्नांसाठी संभाजीराजे यांनी ‘स्वराज्य’ संघटनेची स्थापना केली. ही कोणतीही राजकीय संघटना नसून जनतेच्या न्याय हक्कांसाठी ही संघटना काम करेल, असं संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं आहे.