मुंबई : सूर्य आणि चंद्र ग्रहण या खगोली घटना असल्या तरी ज्योतिषशास्त्रात याचं महत्त्व खूप आहे. वर्षातील पहिलं सूर्यग्रहण 20 एप्रिल 2023 रोजी असून मेष राशीत होणार आहे. या राशीत आधीच राहु ग्रह असल्याने सूर्याच्या युतीमुळे महिनाभरासाठी ग्रहण योग असणार आहे. मेष ही सूर्याची उच्च रास आहे. दुसरीकडे, वैज्ञानिक दृष्टीकोनातून विचार करता यंदा सूर्यग्रहण तीन पद्धतीने दिसणार आहे. जवळपास 100 वर्षानंतर असा योग जुळून आला आहे. या ग्रहणाला विज्ञानाच्या भाषेत हायब्रिड सूर्यग्रहण असं नाव देण्यात आलं आहे. या सूर्यग्रहणाबाबत माहिती आणि कोणत्या राशींवर चांगला परिणाम होणार जाणून घेऊयात.
वर्षातील पहिलं सूर्यग्रहण 20 एप्रिल 2023 रोजी सकाळी 7 वाजून 4 मिनिटांनी सुरु होईल. हे ग्रहण दुपारी 12 वाजून 29 मिनिटांपर्यंत असेल. म्हणजेच जवळपास 5 तास 24 मिनिटांचा काळ असेल. पण हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नसल्याने सूतक कालावधी पाळण्याची गरज नाही. पण इतर ठिकाणांहून हे सूर्यग्रहण खग्रास, खंडग्रास आणि कंकणाकृती पद्धतीने दिसणार आहे.
सूर्यग्रहणाच्या वेळी जर ग्रहण खंडग्रास, खग्रास आणि कंकणाकृती असेल तर त्याला वैज्ञानिक भाषेत हायब्रिड सूर्य ग्रहण संबोधलं जातं. अशी खगोलीय घटना देशात 100 वर्षानंतर होत आहे.
खंडग्रास सूर्यग्रहणात चंद्र सूर्याच्या थोडासा भाग प्रभावित करतो. तर खग्रास सूर्यग्रहणात सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात. त्यामुळे पृथ्वीच्या एका भागात पूर्ण अंधार तयार होतो. दुसरीकडे, कंकणाकृती सूर्यग्रहणात चंद्र सूर्याच्या मधोमध येतो तेव्हा सूर्य कंकणाकृती दिसतो.
ज्योतिषशास्त्रानुसार, वर्षातील पहिलं सूर्यग्रहण भारतातून दिसत जरी नसलं तरी 12 राशींवर परिणाम दिसून येईल. पण सूतक कालावधी पाळण्याची गरज नाही. सिंह, वृश्चिक, कुंभ आणि मीन राशीच्या जातकांना फायदा होईल. या राशींना समाजात मान सन्मान आणि उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील.
वर्षातील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण 14 ऑक्टोबर 2023 रोजी असणार आहे. दुसऱ्या सूर्यग्रहणाचा मेष, कर्क, तूळ आणि मकर राशीवर परिणाम होईल. पण हे ग्रहण पश्चिम आफ्रिका, उत्तर अमेरिकेतून दिसणार आहे. त्यामुळे भारतात सूतककाल मान्य नसेल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)