मुंबई : चालू महिन्यामध्ये कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची (Congress President) निवड होत आहे. यावेळी कॉंग्रेस कुटुंबातील सदस्य ही निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर झाल्यानंतर अशोक गहलोत (Ashok Gehlot) यांचे नाव चर्चेत होते. शिवाय गांधी परिवाराची (Gandhi Family) पसंतही गहलोत यांनाच होती. पण त्यांनी माघार घेतल्यानंतर आता मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरुर यांच्यात सरळ लढत होणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपर्यंत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या सुरु असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाले आहे. नेमके झाले कसे असा प्रश्न अनेकांच्या मनात कायम आहे.
अशोक गहलोत हे राजस्थानचे मुख्यमंत्री तर आहेतच पण तेथील सरकारमध्ये त्यांच्या आमदारांचा एक गट आहे. शिवाय त्यांची अध्यक्षपदी वर्णी लागली तर येथील मुख्यमंत्रीपद हे सचिन पायलट यांच्याकडेच जाणार अशी चर्चा सुरु झाली होती.
सचिन पायलट यांचे नाव समोर येताच गहलोत यांनी मुख्यमंत्रीपदी आपल्या निकटवर्तीयाची वर्णी लागावी अशी फिल्डिंग लावण्यास सुरवात केली होती. त्यामुळे गहलोत आणि त्यांच्या गटातील आमदारांची बैठका पार पडत होत्या.
त्याच बैठकातून सचिन पायलट हे मुख्यमंत्री होणार असतील तर तो आम्हाला मान्य नाही असे म्हणणारा एक गट समोर आला. एवढेच नाहीतर सचिन पायलट यांना थेट विरोध असल्याचे सांगण्यासाठी गहलोत गटातील काही आमदारांनी राज्यपाल सी.पी जोशी यांच्याकडे सामूहिक राजिनामे दिले होते.
राजस्थानमध्ये निर्माण झालेली परस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सोनिया गांधी यांनाच हस्तक्षेप करावा लागला. सुरवातीला सचिन पायलट आणि नंतर अशोक गहलोत हे दिल्ली वारीवर गेले होते. त्यानंतर अशोक गहलोत यांनी या निवडणुकीतूनच माघार घेतली. आमदारांच्या भूमिकेबद्दल त्यांना पक्षाकडून नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
अशोक गहलोत यांनी घेतलेल्या भूमिकेवर सोनिया गांधी देखील नाराज आहेत. अशोक गहलोत यांच्याकडून त्यांना अशी अपेक्षा नव्हती. राजस्थानातील घटनाक्रम पाहता अशोक गहलोत यांना उमेदवारीच न दिलेली बरी अशी पक्षाची भावना झाली.
गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणूकीला घेऊन चर्चा सुरु आहे. पण 19 ऑक्टोबर रोजी कॉंग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक होत आहे. त्यामुळे मल्लिकार्जुन खरगे की शशी थरुर यापैकी कुणाची वर्णी लागणार हे पहावे लागणार आहे.