मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचा गोचर कालावधी ठरलेला आहे. एका ठरावीक कालावधीनंतर ग्रह राशी बदल करतात. चंद्र हा सर्वात वेगाने राशी बदल करतो. त्यानंतर सूर्याजवळ असलेल्या बुध ग्रहाचा क्रमांक येतो. सूर्याजवळ असल्याने बुधाचं अस्त आणि उदयाला येण्याचं प्रमाणही जास्त आहे. आता सूर्य आणि बुध ग्रह पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. एका वर्षानतर सूर्य तूळ राशीत प्रवेश करणार आहे. या स्थितीला तूळ संक्रांती असं म्हटलं जातं. 11 ऑक्टोबरला सूर्य तूळ राशीत प्रवेश करताच हा योग जुळून येणार आहे. तसेच केतु ग्रह हा 30 ऑक्टोबरपर्यंत असल्याने थोडी काळजी घ्यावी लागणार आहे. तीन राशीच्या जातकांना सकारात्मक परिणाम दिसून येईल. चला जाणून घेऊयात कोणत्या राशींना लाभ होईल ते…
कन्या : या राशीच्या जातकांना सूर्य आणि बुधाची स्थिती फायदेशीर ठरेल. कारण हा योग धन स्थानात होणार आहे. या काळात अचानक धनलाभ होऊ शकतो. तुमचे अडकलेले पैसेही तुम्हाला मिळू शकतात. तुमच्या कामात तुम्हाला सकारात्मक बदल दिसून येईल. हातात घेतलेली कामं पूर्ण होत असल्याने तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण जितकी कामं पूर्ण करता येतील तितकी करण्याचा प्रयत्न करा. आपल्या माध्यमातून कोणी दुखावणार नाही याची काळजी घ्या. मार्केटिंग, मीडिया क्षेत्राशी निगडीत लोकांना फायदा होईल.
धनु : या राशीच्या उत्पन्न स्थानात बुधादित्य योग तयार होणार आहे. आर्थिक स्थिती सुधारलेली दिसेल. तुम्ही घेतलेली उसनवारी या काळात फेडून टाका. जोडीदारासोबत चांगले संबंध प्रस्थापित होतील. लॉटरी किंवा शेअर बाजारातून चांगला परतावा मिळू शकतो. व्यवसायासाठी प्लानिंग करा आणि त्या पद्धतीने अंमलबजावणी करा. कुटुंबासोबत चांगला वेळ व्यतित कराल. पत्नीसोबत छोटेमोठे वाद असतील तर ते दूर करा. मुलांच्या अभ्यासात प्रगती दिसून येईल.
मकर : या राशीच्या कर्म स्थानात बुधादित्य योग तयार होत आहे. त्यामुळे कामात तुम्हाला चांगल्या घडामोडी घडताना दिसतील. तुम्ही सांगितल्याप्रमाणे अंमलबजावणी होईल. पार्टनरशिपच्या धंद्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. प्रवासाचा योग जुळून येईल. आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. तसेच आपल्या वागण्याचा कोणाला राग येणार नाही याची काळजी घ्या. आरोग्य विषयक तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)