मुंबई : ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या गोचरामुळे शुभ अशुभ योग तयार होतात. अशीच काहिशी स्थिती चंद्र आणि गुरुच्या स्थितीमुळे तयार झाली आहे. गुरु ग्रह सध्या मेष राशीत राशीत आहे. तर 17 सप्टेंबरला चंद्र रात्री 11 वाजून 11 मिनिटांनी तूळ राशीत प्रवेश करणार आहे. चंद्र तूळ राशीत 20 सप्टेंबरला सकाळी 8 वाजून 44 मिनिटांपर्यंत राहील. त्यामुळे दोन्ही ग्रह एकमेकांपासून 180 डिग्रीत असणार आहे. त्यामुळे अत्यंत शुभ असा गजकेसरी योग तयार होणार आहे. पण मेष राशीत राहु आणि तूळ राशीत केतु हा ग्रह आहे. दोन्ही ग्रह कायम 180 डिग्रीत असतात. त्यामुळे शुभ अशा योगावर राहु-केतुची नजर असणार आहे. त्यामुळे राशीचक्रातील काही राशींना अशुभ परिणाम भोगावा लागू शकतो. अडीच दिवस हा परिणाम असणार आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या राशींना अशुभ परिणाम भोगावा लागेल ते..
मेष : या राशीतच गुरु आणि राहु एकत्र बसले आहेत. त्यामुळे चांडाळ योग तयार झाला आहे. हा योग 30 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. त्यात गजकेसरी योगावर केतुची नजर असणार आहे. दुसरीकडे, तूळ राशीत चंद्र आणि केतुच्या युतीमुळे ग्रहण योग असेल. त्यामुळे या राशीच्या जातकांना मानसिक, शारीरिक आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आई वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. काही अनपेक्षित घडामोडी या काळात घडतील. वैवाहिक जीवनात अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
तूळ : मेष राशीच्या उलट ग्रहांची स्थिती तूळ राशीत असणार आहे. चंद्र आणि केतुच्या युतीमुळे ग्रहण योग असणार आहे. त्यावर राहुची नजर असल्याने अडचणीत वाढ होईल. वैवाहिक जीवनात कलह निर्माण होईल. छोट्या छोट्या कारणामुळे वाद होऊ शकतो. कायदेशीर प्रकरणात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आरोग्यविषयक तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. विनाकारण पैसा खर्च होईल.
धनु : गजकेसरी योगाची नजर पाचव्या आणि अकराव्या स्थानावर असणार आहे. पण राहु आणि केतुमुळे सर्वच बिघडलेलं राहील. होणारी कामंही होत नाही म्हणून अस्वस्थ व्हाल. प्रेमप्रकरणातही अडचणींचा डोंगर उभा राहील. घरच्यांचा टोकाचा विरोध होईल. उद्योगधंद्यात नुकसान होऊ शकतं. नोकरी करणाऱ्या जातकांना या कालावधीत शांत राहणं योग्य ठरेल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)