मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. सूर्य, चंद्र, बुध, गुरु आणि शुक्र हे शुभ ग्रह आहेत. तर मंगळ, शनि, राहु आणि केतु हे पाप ग्रह आहेत. या वर्गवारीनुसार ग्रहांचा प्रभाव जातकांवर पडत असतो. त्यामुळे कोणता ग्रह कोणत्या राशीत स्थित आहे याकडे ज्योतिष्याचं लक्ष लागून असतं. तसं पाहिलं तर मेष राशीत राहु आणि गुरु हे ग्रह एकत्र असल्याने चांडाळ योग सुरु आहे. पण गुरु ग्रहाने नक्षत्र बदलल्याने चांडाळ योग भंग झाला आहे. 21 जून 2023 रोजी गुरु ग्रहाने अश्विनी नक्षत्रातून भरणी नक्षत्रात प्रवेश केला आहे. 27 नोव्हेंबर 2023 पर्यंत गुरु ग्रह भरणी नक्षत्रातून पुन्हा अश्विनी नक्षत्रात प्रवेश करेल. असं असताना भरणी नक्षत्रातील गुरु तीन राशीच्या जातकांना फलदायी ठरणार आहे.
मेष : या राशीच्या जातकांना गुरुच्या नक्षत्र बदलामुळे फायदा होईल. भरणी नक्षत्रातील गुरु ग्रह फलदायी ठरेल. याच राशीच्या पहिल्या स्थानात म्हणजेच लग्न स्थानात गुरु आणि राहुची युती झाली आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना गेल्या काही दिवसात प्रचंड त्रास सहन करावा लागला होता. आता नक्षत्र बदलामुळे चांडाळ योग भंग झाला आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांमध्ये प्रचंड आत्मविश्वास वाढलेला दिसेल. तसेच गेल्या काही दिवसांपासून असलेले वाद संपताना दिसतील.
मिथुन : गुरु ग्रहाने नक्षत्र बदलल्याने या राशीच्या जातकांनाही फायदा होणार आहे. सध्या गुरु राहुची युती अकराव्या स्थानात आहे. त्यामुळे आर्थिक गणित बिघडलं होतं. मात्र ही युती जरी असली तर गुरुने नक्षत्र बदलल्याने भंग पावली आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांचा आर्थिक प्रश्न सुटेल. उत्पन्नाचे नवे स्रोत या काळात तयार होतील. प्रॉपर्टी खरेदी करण्याचा योग जुळून येईल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो.
कर्क : या राशीच्या दहाव्या स्थानात गुरु आणि राहुची युती झाली आहे. त्यामुळे गुरु ग्रहाने नक्षत्र बदल केल्याने दिलासा मिळणार आहे. काही चांगल्या बातम्या या काळात कानावर पडतील. अचानकपणे धनलाभ होऊ शकतो. नोकरीच्या शोधात असलेल्या जातकांना चांगली संधी चालून येईल. तसेच व्यवसाय करणाऱ्या जातकांना काही नवे टेंडर किंवा करार निश्चित होऊ शकतात. कौटुंबिक वातावरण या काळात चांगलं राहील.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)