मुंबई : ग्रहांचं गोचर आणि त्यांची दृष्टी ज्योतिषशास्त्रात खूपच महत्त्वाची असते. कोणता ग्रह कोणत्या स्थानात विराजमान आहे आणि कोणत्या दृष्टीने पाहात आहे यावरून आकलन केलं जातं. प्रत्येक ग्रहाच्या स्थितीवरून अंदाज व्यक्त केला जातो. कधी कधी दोनपेक्षा अधिक ग्रह एकाच राशीत येतात. त्यामुळे त्या दोन ग्रहांमुळे तयार होणार योग राशीचक्रावर प्रभाव टाकत असतो. मित्र ग्रह असतील तर ठीक, नाही तर अभद्र युतीचा फटका सहन करावा लागतो. फेब्रुवारी महिन्यात बुध आणि शुक्राच्या युतीमुळे शुभ असा लक्ष्मीनारायण योग तयार होत आहे. फेब्रुवारी महिन्यात फक्त 7 दिवसांसाही हे दोन ग्रह एकत्र येणार आहे. अर्थात या सात दिवसात काही राशींना पाठबळ मिळणार आहे. 1 फेब्रुवारीला बुध ग्रह धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करेल. त्यानंतर 12 फेब्रुवारीला शुक्र ग्रह सकाळी 4 वाजून 41 मिनिटांनी मकर राशीत येईल. त्यानंतर 20 फेब्रुवारीला बुध ग्रह सकाळी 6 वाजता कुंभ राशीत प्रवेश करताच हा योग संपुष्टात येईल.
मेष : या राशीच्या दशम स्थानात बुध आणि शुक्राची युती होत आहे. या स्थानाला उत्पन्नाचं स्थान संबोधलं जातं. या दोन्ही ग्रहांच्या युतीचा सकारात्मक परिणाम या स्थानावर होईल. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. तसेच या कालावधीत केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. शुक्राच्या प्रभावामुळे आपल्या शब्दाला मान मिळेल. त्यामुळे काही कामं झटपट पूर्ण होतील.
कन्या : या राशीच्या चतुर्थ स्थानात बुध आणि शुक्राची युती होत आहे. या युतीमुळे वडिलोपार्जित संपत्तीतून चांगला लाभ मिळेल. नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी उत्तम कालावधी आहे. आर्थिक घडी या कालावधीत बसेल. नोकरी करणाऱ्या जातकांना अपेक्षित परिणाम दिसून येतील. बॉसकडून कौतुकाची थाप पाठीवर पडेल. त्यामुळे काम करण्याचा हुरूप वाढेल.
मकर : या राशीच्या लग्न स्थानात म्हणजेच प्रथम स्थानात बुध शुक्राची युती होत आहे. यामुळे आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल. बुध वाणीचा कारक आणि शुक्र प्रसिद्धीचा कारक असल्याने प्रभाव दिसून येईल. आपली समाजमनात वेगळीच छाप पडेल. आत्मविश्वासामुळे मोठी डील करू शकता. आपण जो शब्द देऊ ते पाळण्याचा इतर लोक प्रयत्न करतील. कौटुंबिक स्तरावर चांगलं वातावरण राहील.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)