चांडाळ योग सुरु असताना विष योगाची स्थिती, शनि चंद्राची युती या राशींना पडणार महागात

| Updated on: Apr 28, 2023 | 2:32 PM

ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीत विष योग तयार होणार आहे. यामुळे शुभ अशुभ परिणाम भोगावे लागतील. चला जाणून घेऊयात कोणत्या राशींवर या योगाचा प्रभाव पडेल.

चांडाळ योग सुरु असताना विष योगाची स्थिती, शनि चंद्राची युती या राशींना पडणार महागात
शनि चंद्राच्या युतीमुळे या राशींवर दिसेल अशुभ प्रभाव, विष योगात करावा लागणार अडचणींचा सामना
Follow us on

मुंबई : ज्योतिषशास्त्राची गणितं क्षणाक्षणाला बदलत असतात. त्याचा परिणाम मानवी जीवन आणि पृथ्वी तलावर होत असतो. त्यामुळे ग्रहांच्या हालचालीकडे ज्योतिष्यांचं बारीक लक्ष असतं. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा सर्वात वेगाने राशी बदलणारा ग्रह आहे. एका राशीत सव्वा दोन दिवस ठाण मांडून बसतो. त्यामुळे शुभ अशुभ योग घडत असतात. शनिदेव 17 जानेवारी 2023 पासून कुंभ राशीत अडीच वर्षांसाठी ठाण मांडून आहेत. त्यामुळे चंद्र गोचर करत कुंभ राशीत येणार आहे. त्यामुळे विष योग तयार होणार आहे.

ज्योतिषशास्त्रानुसर चंद्र 13 मे रोजी मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करेल. मध्यरात्री 12 वाजून 18 मिनिटांनी हा प्रवेश असेल. चंद्र या राशीत 15 मे पर्यंत असणार असून त्याच दिवशी रात्री 3 वाजून 23 मिनिटांनी मीन राशीत राशीत प्रवेश करेल. त्यामुळे 13 मे ते 15 पर्यंत विष योगाची स्थिती असणार आहे.

चंद्र आणि शनिच्या युतीमुळे काही राशींवर विपरीत परिणाम दिसून येईल. ज्योतिषशास्त्रात या युतीला अशुभ युती म्हणून संबोधलं गेलं आहे. चला जाणून घेऊयात राशींबाबत..

या राशींनी राहावं सावध

कर्क : या राशीचा स्वामी ग्रह चंद्र आहे. या राशीच्या अष्टम स्थानात ही युती होणार आहे. विशेष म्हणजे अडीचकी सुरु असताना ही युती होणार असल्याने वाईट अनुभव येतील. छोट्यातलं छोटं काम करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. प्रत्येक कामात काही ना काही अडचण येईल. मुलांकडून तुम्हाला अधिकचा त्रास होईल. वैवाहिक जीवन तणावपूर्ण राहील.

कन्या : या राशीच्या षष्टम भावात चंद्र आणि शनिची युती होत आहे. यामुळे या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. शत्रूपक्ष तुमच्यावर भारी पडेल. विनाकारण पैसा खर्च होईल आणि त्यातून हवं तसं हाती काहीच लागणार नाही. कदाचित कर्जाच्या ओझ्याखाली जाल. नोकरीच्या ठिकाणीही सांभाळून राहावं लागेल. आर्थिक स्थिती कमकुवत झाल्याने कौटुंबिक वाद होतील.

वृश्चिक : या राशीच्या चतुर्थ स्थानात शनि आणि चंद्राची युती होत आहे. तसेच वृश्चिक राशीला शनि अडीचकी सुरु आहे. त्यामुळे अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मानसिक त्रास या काळात होईल. दुसरीकडे, संकट एकदम चालून आल्याने अस्वस्थ व्हाल. गुंतवणूक करताना दहा वेळा विचार करा. कदाचित तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकते. मेहनत करणं भाग आहे लक्षात ठेवा.

( Disclaimer : येथे दिलेली माहिती उपलब्ध स्रोतावर आधारित आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही. )