मुंबई : धनत्रयोदशीच्या सणापासून दिवाळीची (Diwali 2023) सुरुवातही मानली जाते. यंदा धनत्रयोदशी 10 नोव्हेंबरला आहे. या दिवशी प्रदोष काळात देवी लक्ष्मी, भगवान गणेश, कुबेर आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते. भगवान धंवंतरी यांना आयुर्वेदाचे जनक म्हणतात. धर्मग्रंथात सांगितलेल्या कथांनुसार, समुद्रमंथनाच्या वेळी भगवान धन्वंतरी हातात अमृताचे भांडे घेऊन प्रकट झाले. ज्या तिथीला भगवान धन्वंतरी समुद्रातून निघाले ती कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी होती. भगवान धन्वंतरी समुद्रातून कलश घेऊन प्रकटले, त्यामुळे यानिमित्ताने भांडी खरेदी करण्याची परंपरा कायम आहे. भगवान धन्वंतरी हे भगवान विष्णूचे अंश मानले जातात आणि त्यांनीच जगभरात वैद्यकीय शास्त्राचा प्रचार आणि प्रसार केला. भगवान धन्वंतरीनंतर, देवी लक्ष्मी दोन दिवसांनी समुद्रातून बाहेर पडली, म्हणून त्या दिवशी दिवाळीचा सण साजरा केला जातो. त्यांची पूजा केल्याने आरोग्य आणि सुख प्राप्त होते. धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदीला विशेष महत्त्व आहे. अशा परिस्थितीत या दिवशी कोणती खरेदी करणे शुभ आहे आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हे जाणून घेऊया.
धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्या-चांदीच्या वस्तू खरेदी करण्याचे विशेष महत्त्व आहे, परंतु याशिवाय काही वस्तू घरी आणणे देखील शुभ मानले जाते. वास्तूनुसार झाडणीला माता लक्ष्मीशी संबंधित मानले जाते. अशा परिस्थितीत धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी करून घरी आणल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते.
धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही गोमती चक्र खरेदी करू शकता. हे देखील देवी लक्ष्मीचे आवडते मानले जाते. ते दिवाळीच्या पूजेतही ठेवा. यासोबतच अक्षत म्हणजेच अखंड तांदूळ देखील हिंदू धर्मात अतिशय शुभ मानला जातो. त्यामुळे धनत्रयोदशीला अक्षतही घरी आणावे. धनत्रयोदशीला तुम्ही पितळेची भांडी देखील खरेदी करू शकता, यामुळे सुख आणि समृद्धी मिळते.
दिवाळीत लक्ष्मी गणेशाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. अशा परिस्थितीत धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी-गणेशाची मूर्ती आणावी. हे अत्यंत शुभ मानले जाते. यासोबतच तुम्ही घरी चांदी किंवा सोन्याची नाणीही आणू शकता, यामुळे लक्ष्मीची कृपा होईल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)