मुंबई : वर्ष 2023 मध्ये तीन मोठे ग्रह गोचरामुळे राशी मंडळातील स्थिती बदलणार आहे. वर्षाच्या सुरुवातीला न्यायदेवता शनिदेवांना गोचर करत कुंभ राशीत ठाण मांडलं आहे. आता एप्रिल महिन्यात देवगुरु बृहस्पती मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. तर ऑक्टोबर महिन्यात राहु-केतु आपली राशी बदलणार आहेत. या स्थितीचा परिणाम काही काळापर्यंत राहणार आहे. या काळात काही शुभ अशुभ युती होणार आहे. गुरु गोचरामुळे अध्यात्म आणि धार्मिक कार्यात रुची वाढते.
गुरु ग्रह 22 एप्रिल 2023 रोजी मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. या गोचरामुळे प्रभावित व्यक्तींची अध्यात्म आणि धार्मिक कार्यात रुची वाढेल. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुरु ग्रह हा प्रगती आणि समृद्धी कारक ग्रह आहे.
देवगुरु बृहस्पती 27 नक्षत्रांमधील पुनर्वसु, विशाखा आणि पूर्वी भाद्रपद नक्षत्रांचा स्वामी आहे. गुरु ग्रह जवळपास 13 महिन्यांतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. मेष राशीत 12 वर्षानंतर विराजमान होणार आहे.
मेष – या राशीत गुरु ग्रह वर्षभरासाठी ठाण मांडणार आहे. एन्ट्री मारताच गजकेसरी योग जुळून येणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून अडकलेली कामं पूर्ण होतील. तसेच आजारातून काही लोकांना दिलासा मिळेल. वैवाहित जीवन आनंददायी जाईल. देवदर्शनाचा योग जुळून येईल.
मिथुन – गुरु ग्रहाच्या गोचरामुळे मिथुन राशीच्या जातकांना फायदा होईल. गुंतवणुकीच्या नव्या संधी चालून येतील. उद्योगाशी निगडीत काही चांगल्या बातम्या कानावर पडतील. मात्र असलं तरी खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.
कन्या – या राशीच्या जातकांवर गुरु गोचराचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. तुम्ही घेतलेल्या प्रत्येक निर्णयात कुटुंबाची साथ मिळेल. गुरुमुळे धार्मिक यात्रा करण्याचा योग जुळून येईल.
कर्क – गुरु ग्रहाच्या गोचरामुळे या राशीला चांगले दिवस अनुभवता येतील. आर्थिक लाभ हवा तसा होणार नाही. मात्र समाजात मानसन्मान वाढेल. कामाच्या ठिकाणी कामाचं कौतुक होईल. त्यामुळे भविष्यात त्याचा फायदा होईल.
मीन – या राशीच्या दुसऱ्या स्थानात गुरु ग्रह गोचर करणार आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती चांगली राहील. चांगल्या नोकरीची ऑफर चालून येईल. असं असलं तरी आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)