मुंबई: राशीचक्र हे ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून आहे. कोष्टकाच्या घरात कोणता ग्रह कोणत्या स्थानात बसला आहे, यावरून भाकीत केलं जातं. 12 स्थानांचं महत्त्व आणि ग्रहांचा स्वभाव यावर ज्योतिषशास्त्र अवलंबून असतं. त्यात ग्रहांची युती बरंच काही सांगून जाते. पाप ग्रह आणि शुभ ग्रह एकत्र आले तर काही अशुभ परिणामांना सामोरं जावं लागतं. राहु आणि गुरु युती (Guru And Rahu Yuti) त्यापैकीच एक आहे. या युतीला ज्योतिषशास्त्रात चांडाळ योग (Chandal Yog 2023) असं म्हंटलं जातं. जातकाच्या वैयक्तिक कुंडलीत हा योग असेल अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. गोचर कुंडलीनुसार मेष राशीत (Mesh Rashi) 23 एप्रिलपासून चांडाळ योग तयार होत आहे. मेष राशीत आधीच राहु ठाण मांडून बसला आहे. दुसरीकडे, गुरु मीन राशीतील आपली कारकिर्द संपवून 23 एप्रिलला मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे मेष राशीत चांडाळ योग तयार होणार आहे.
पापग्रह राहु ग्रह 30 ऑक्टोबरला आपल्या उलट्या चालीनुसार मीन राशीत प्रवेश करेल. त्यानंतर गोचर कुंडलीतील चांडाळ योग संपुष्टात येईल. म्हणजेच 23 एप्रिल 2023 ते 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत मेष राशीत चांडाळ योग असणार आहे. यामुळे काही राशींना शुभ, तर काही राशींना अशुभ फळ भोगावी लागतील. चला जाणून घेऊयात कोणत्या राशींना या काळात काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
मेष- या राशीतच गुरु- राहु चांडाळ योग तयार होणार आहे. त्यामुळे या काळात विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. या योगामुळे आत्मविश्वासात कमतरता दिसून येईल. तसेच जोडीदारासोबत वाद होण्याची दाट शक्यता आहे. आरोग्य विषयक तक्रारीही या काळात दिसून येतील. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसोबत वाद होईल, असं ग्रहमान आहे. आर्थिक अडचणींनाही या काळात सामोरं जावं लागेल.
मिथुन- या राशीच्या जातकांनाही गुरु चांडाळ योग त्रासदायक ठरणार आहे. हा योग उत्पन्नाच्या स्थानात होणार आहे. त्यामुळे गुंतवणूक करताना काळजी घेणं आवश्यक आहे. व्यवसाय आणि राजकारणाशी निगडीत लोकांनी काळजी घेणं आवश्यक आहे. शेअर बाजारात केलेल्या गुंतवणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात संयम बाळगणं आवश्यक आहे.
कर्क- या राशीच्या जातकांना सध्या शनिच्या अडीचकीला सामोरं जावं लागत आहे. दुसरीकडे चांडाळ योग दहाव्या स्थानात तयार होत आहे. करिअर आणि व्यवसायात तोटा सहन करावा लागू शकतो. त्याचबरोबर वाणीवर संयम ठेवणं गरजेचं आहे. कामाच्या ठिकाणी छोट्या छोट्या कारणावरून वाद होऊ शकतात. या काळात प्रवास करताना विशेष काळजी घ्या
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)