मुंबई : संकटमोचक हनुमानाची दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला जयंती साजरी केली जाते. हिंदू पंचांगानुसार या वर्षी हनुमान जयंती 6 एप्रिल 2023 रोजी साजरी केली जाईल. अंजनीपूत्र हनुमान अष्टचिरंजीवी पैकी एक आहेत. त्रेता युगात अंजनी मातेच्या पोटी हनुमानांचा जन्म झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत हनुमानांचा या पृथ्वीवर वास असल्याचं शास्त्रात सांगितलं आहे. रामभक्त हनुमान शक्तीचं प्रतिक आहे. मारुतीरायाची उपासना केल्यावर तेज, बळ, बुद्धी, धन, ऐश्वर्य आणि सुखाची प्राप्ती होते.
हनुमान जयंतीला शुक्र ग्रह राशी परिवर्तन करणार आहे. त्यामुळे गुरु आणि शुक्राच्या स्थितीमुळे लक्ष्मी योग तयार होणार आहे. त्यामुळे यंदाची हनुमान जयंती खास असणार आहे. हनुमान जयंतीला हनुमान चालीसा आणि सुंदरकांडचं पठण करा. यंदाच्या हनुमान जयंतीला काही राशींवर हनुमानाची कृपा असणार आहे. चला जाणून घेऊयात या राशींबाबत…
कर्क- या राशीच्या जातकांना हनुमान जयंती लाभदायी ठरणार आहे. आर्थिक प्रगती होताना दिसून येईल. तसेच अडकलेली कामं मार्गी लागतील. उत्पन्नाचे नवे स्त्रोत तयार होतील. नोकरीच्या ठिकाणी नवी जबाबदारी मिळू शकते. आपलं लक्ष्य गाठण्यासाठी उत्तम संधी आहे. कुटुंबाचीही योग्य साथ मिळेल.
वृषभ – या राशींवरही हनुमानाची कृपा राहील. यामुळे या काळात तुम्हाला तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. काही कठीण कामं तुम्ही चुटकीसरशी पूर्ण कराल. प्रत्येक कामात यश मिळताना दिसेल. आर्थिक बाबतीतही तुम्ही या काळात सक्षम व्हाल. एकंदरीत एप्रिल महिना तुमच्यासाठी खूप चांगला असणार आहे.
कुंभ – या राशीच्या जातकांना मारुतीरायाचा अनुभव येईल. साडेसातीच्या काळात मारुतीरायाची केलेली पूजा फळास येईल. येणारी संकटं सौम्य होऊन येतील. तसेच आत्मविश्वास वाढल्याने चिंता दूर होईल. नोकरीच्या ठिकाणी केलेल्या मेहनतीचं फळ मिळेल. इतकंच काय तर पदोन्नती होण्याची शक्यता आहे.
मीन – शनिच्या छत्रछायेखाली असताना मारुतीरायांना शरण गेलं की मार्ग सापडतो. या काळात तुम्हाला मारुतीराया पाठबळ देतील. बजरंगबळीची नित्यनेमाने पूजा करा. यामुले शनिदेवांचा अशुभ प्रभाव दूर होईल. या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्हाला योग्य फळ मिळेल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)