मुंबई: भगवान शिवाचे भक्त मोठ्या आतुरतेने महाशिवरात्रीची (Maha Shivratri 2023) वाट पाहतात. हिंदू पंचांगानुसार वर्षाला 12 शिवरात्री असतात. मात्र माघ महिन्यातील शिवरात्री खास असते म्हणून महाशिवरात्री म्हटलं जातं. यंदा महाशिवरात्री 18 फेब्रुवारीला साजरी केली जाईल. या दिवशी भगवान शिवांची मनोभावे पूजा केल्यास मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. हिंदू मान्यतेनुसार या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता. महाशिवरात्रीला देशभरातील ज्योतिर्लिंग आणि शिवालयात भक्तांची रिघ लागते. मोठ्या भक्तिभावाने शिवलिंगावर जलाभिषेक केला जातो. महाशिवरात्री कृष्ण पक्षातील चतुर्दशीला सुरुवात होते. 18 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 8 वाजून 2 मिनिटांनी महाशिवरात्रीला सुरुवात होईल. तसेच 19 फेब्रुवारी 2023 रोजी संध्याकाळी 4 वाजून 18 मिनिटांनी समाप्ती होईल.
महाशिवरात्रीचा शुभ मुहूर्त
माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला भगवान शंकर लिंगाच्या स्वरुपात प्रकट झाले होते. त्यामुळे या तिथीला शिवाच्या ज्योतिर्लिंग प्रकट रुप म्हणून महाशिवरात्री साजरी केली जाते. शिव पुराणानुसार शंकराचं निराकार रुपाचं प्रतिक असलेलं लिंग या तिथीला प्रकट झालं. या रुपाची सर्वप्रथम ब्रह्मा आणि विष्णुने पूजा केली होती.दुसऱ्या पौराणिक कथेनुसार, या दिवशी भगवान शंकर आणि पार्वतीचं लग्न झालं होतं. भगवान शिवांनी वैराग्य सोडून पार्वतीशी विवाह करत गृहस्थ जीवनात प्रवेश केला होता. त्यामुळे या दिवशी महाशिवरात्री मोठ्या थाटात साजरी केली जाते. काही ठिकाणी शिवभक्त वरात देखील काढतात.