मुंबई : हिंदू धर्मात अनेक तिथी आहेत आणि सर्वांचे स्वतःचे महत्त्व आहे. त्यातील एक म्हणजे अमावस्या. पौष महिन्यात येणाऱ्या अमावस्याला मौनी (Mouni Amavasya) अमावस्या म्हणतात. जैन धर्मात याला विशेष महत्त्व आहे. हिंदूंमध्ये ही दर्श अमावस्या म्हणून पाळली जाते. पौराणिक कथेनुसार या दिवशी मनु ऋषींचा जन्म झाला होता. या दिवशी भगवान शिव आणि भगवान विष्णूची पूजा करणे खूप शुभ मानले जाते. पंचांगानुसार, 2024 मध्ये मौनी अमावस्या तिथी 9 फेब्रुवारीला सकाळी 8.02 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 10 फेब्रुवारीला पहाटे 4:28 वाजता समाप्त होईल. त्यामुळे 9 फेब्रुवारीला मौनी अमावस्या पाळली जाणार आहे.
मौनी अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने शुभ फळ मिळते. मौनी अमावस्येच्या दिवशी गंगा स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी हजारो भाविक प्रयागराज, उत्तर प्रदेश येथे संगम स्नान करण्यासाठी जमतात. ज्यांना कोणत्याही पवित्र नदीत स्नान करता येत नाही ते घरातील पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करतात.
मौनी अमावस्येच्या दिवशी पूजेसोबतच स्नान केल्यानेही हजारो पटींनी अधिक पुण्य प्राप्त होते. या दिवशी सूर्यदेवाला दूध आणि तीळ अर्पण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.
याशिवाय मौनी अमावस्येच्या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवल्याने पितर प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
अमावस्येच्या दिवशी चंद्र दिसत नाही त्यामुळे मानसिक स्थिती बिघडू शकते. या दिवशी मौन पाळल्याने मानसिक स्थिती चांगली राहते आणि मन कमजोर होत नाही, असे म्हटले जाते. पौराणिक कथेनुसार या दिवशी ऋषीप्रमाणे मौन बाळगावे आणि वाईट बोलणे टाळावे. असे केल्याने शुभ फल प्राप्त होते. मौनी अमावस्येला भगवान शिव आणि विष्णूची पूजा केल्याने मोक्ष प्राप्त होतो अशी धार्मिक मान्यता आहे.
मौनी अमावस्येच्या दिवशी काही वस्तूंचे दान केल्याने देवता आणि पितरांचा आशीर्वाद सदैव राहतो. या दिवशी तीळ
तांदूळ
तिळाचे लाडू
कपडे
तीळाचे तेल
पैसे दान केल्याने पितृ दोषापासून मुक्ती मिळते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)