मुंबई : हिंदू पंचांगानुसार वर्षभरात येणा-या 27 नक्षत्रांपैकी 9 नक्षत्रं ही पावसाची असतात. पावसाच्या नक्षत्रांची सुरुवात ही जरी रोहिणी नक्षत्रापासून होत असली, तरी पावसाच्या आगमनाचा खरा हर्षोल्हास हा मृग नक्षत्रापासूनच (Mrug Nakshatra 2023) सर्वत्र साजरा केला जातो. मृगशीर्ष नक्षत्रात सूर्य आला की भारतात पावसाळा सुरू होतो. या वर्षी 8 जून 2023 ला सूर्य मृग नक्षत्रात प्रवेश करणार आहे. प्रत्त्येक नक्षत्राचे विशीष्ट वाहन असते यंदा मृग नक्षत्राचे वाहन हत्ती आहे. हत्ती हा संपन्नतेचे प्रतीक मानल्या जाते. त्यामुळे यंदा समाधानकारक पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच बळी राजासाठीसुद्धा हे नक्षत्र संपन्नतेचे ठरणार आहे.
वैदिक ज्योतिषनुसार मृग नक्षत्र हे शेवटच्या स्थानावर येते. याच्या निर्मितीची एक कथा आहे. एक दिवस भगवान ब्रम्हा आपल्याच मुलीच्या मोहात पडले. यामुळे भगवान शंकरांना राग आला. त्यांनी ब्रम्ह देवावर बाण सोडला. शंकराचे ते रौद्र रूप पाहून ब्रम्हा भयभीत झाले व आकाशाकडे धावायला लागले. जेव्हा कोणता मार्ग सापडला नाही तेव्हा मृगाचे रूप घेऊन आकाशात विहार करू लागले. त्या वेळी ब्रम्हाजीच्या त्या सुंदर मृगाच्या रुपाला पाहून त्यांना या रुपात नक्षत्रांमध्ये स्थान मिळाले आणि मग मृग नक्षत्र असे त्याचे नाव पडले. त्याचबरोबर अशीसुद्धा कथा आहे की, शंकराच्या बाणाने ब्रम्ह देवांना आजही माफ केलेले नाही. आजसुद्धा हा बाण आर्द्रा नक्षत्राच्या रूपाने मृग रुपी ब्रम्हाजीच्या मागे आहे.
ज्योतिषनुसार प्रत्येक नक्षत्राचा कोणता ना कोणता ग्रह हा स्वामी असतो. ज्याचा प्रभाव त्या नक्षत्रात जन्मलेल्या लोकांवर पडतो. मृग नक्षत्राचा स्वामी मंगळाला मानले गेले आहे. हेच कारण आहे की या नक्षत्रात जन्मलेल्या लोकांवर मंगळाचा प्रभाव दिसून येतो.
ज्योतिषशास्त्रानुसार या नक्षत्रात जन्मलेल्या लोकांचा प्रेमावर अतूट विश्वास असतो. याव्यतिरिक्त दैनंदिन रोजच्या कामावर त्यांचा जास्त विश्वास असतो. त्यामुळे अशी माणसे घाईगडबडीत काम व नोकरीत बदल करत नाहीत. या नक्षत्रात जन्मलेली माणसे जी काम हातात घेतात, त्यात पूर्ण मन लावून मेहनत घेतात. त्यांचे व्यक्तित्व, रूप आकर्षक असते आणि विश्वासार्ह असतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)